मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची हिंदुत्वाकडे वाटचाल

मनसेचा नवा भगवा रंग 

Updated: Feb 9, 2020, 04:14 PM IST
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची हिंदुत्वाकडे वाटचाल title=

मुंबई : शिवसेनेशी काडीमोड घेतल्यानंतर राज ठाकरेंनी मराठीचा मुद्दा आक्रमक पद्धतीनं हातात घेतला. त्यावेळी राज ठाकरेंना मर्यादित यशही मिळालं. तर शिवसेनेला त्याचा मोठा फटका बसला. पण ही स्थिती फारकाळ राहिली नाही. शिवेसेना पुन्हा वाढली. तर मनसेच्या राजकारणाला ओहटी लागली. त्याचच गेल्या काही वर्षात बहुसंख्याक हिंदूत्ववादी राजकारण लोकांनी स्वीकारलंय. त्यामुळंच भाजपची एक नव्हे दोन वेळा केंद्रात सत्ता आली.  मराठी कार्डाला मर्यादा आहेत म्हटल्यावर मनसेनं हिंदुत्वाचा पुकार केला आहे. त्यासाठी पहिल्यांदाच घुसखोरांचा मुद्दा हाती घेतला आहे.

राज ठाकरेंची मनसे आता भगव्या रंगात रंगली आहे. मुंबईतील मोर्चासाठी हजारो मनसैनिक रस्त्यावर उतरले. तेव्हा त्यांच्या डोक्यावर भगव्या टोप्या आणि हातात राजमुद्रा असलेले भगवे झेंडे होते. या नव्या वेशात आणि रंगात मनसैनिकांचा उत्साहही ओसंडून वाहत होता.

राज्यात हिंदुत्ववादी भूमिका घेऊन भाजप आणि शिवसेना राजकारण करते आहे. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेल्यानं शिवसेनेचं हिदुत्व सौम्य झालंय असं काही राजकीय़ अभ्यासकांना वाटतंय. त्यामुळं कट्टर हिंदुत्ववादी पक्षाची जागा मनसे भरुन काढेल असं काहींना वाटतंय. राज ठाकरेंना हे हिंदुत्वाचं कार्ड कितपत तारेल बीएमसी, आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत स्पष्ट होईल.