मनसेच्या नव्या झेंड्यावर दिसणाऱ्या राजमुद्रेचा अर्थ एकदा वाचाच

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनादरम्यान, अतिशय महत्त्वाचा निर्णय घेत पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण करण्यात आलं. 

Updated: Jan 23, 2020, 03:04 PM IST
मनसेच्या नव्या झेंड्यावर दिसणाऱ्या राजमुद्रेचा अर्थ एकदा वाचाच title=
महाराष्ट्र नवनिर्माण सेना

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनादरम्यान, अतिशय महत्त्वाचा निर्णय घेत पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण करण्यात आलं. गुरुवारी मुंबईच्या गोरेगाव येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात राज ठाकरे यांनी पक्षाची ही नवी ओळख सर्वांसमोर आणली आणि पाहता पाहता त्या ओळखीचीच सर्वदूर चर्चा सुरु झाली. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या नव्या झेंड्याचा रंग बदलून पूर्णपणे केशरी करण्यात आला आहे. ज्याच्या मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्राही दिसत आहे. झेंड्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना असं पक्षाचं नावही लिहिण्यात आलं आहे. 

राज ठाकरे यांच्या मनसे या राजकीय पक्षाच्या नव्या झेंड्यावर असणाऱ्या या राजमुद्रेचं तसं अनन्यसाधारण महत्त्वं. हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नाचा पाठलाग करणाऱ्या शहाजी राजांनी त्यांचं हे स्वप्न आपल्या मुलामध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये पाहिलं. शहाजीराजांनी शिवबांना ही राजमुद्रा आणि प्रधानमंडळ देत त्यांची ध्येय्यनिश्चिती केली. 

वाचा : 'शरद पवारच राजकारणातील चाणक्य आणि चंद्रगुप्तही'

प्रतिपच्चंद्रलेखेव। वर्धिष्णुर्विश्ववंदिता।
शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।

असे शब्द या राजमुद्रेवर लिहिण्यात आले आहेत. ‘प्रतिपदेच्या चंद्रकलेसारखी दर दिवशी, प्रतिदिनी वृध्दिंगत होणारी आणि साऱ्या जगाला वंदनीय असणारी शहाजीपुत्र शिवबांची ही मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे’, हा त्याचा अर्थ. शहाजीचा पुत्र प्रतिदिनी वृद्धिंगत होणारं राष्ट्र निर्माण करणार असल्याचं हे ध्येय. राष्ट्रनिर्माण हे स्वत:च्या सुखासाठी नसून प्रजेच्या हितासाठी असल्याने ही मुद्रा साऱ्या विश्वाला वंदनीय असेल, हा हेतू यातून करण्यात आला होता. हे सारं कार्य करणारा माझा पुत्र शिवाजी आहे आणि जगाच्या कल्याणासाठी त्याचे राज्य आहे असा विश्वास गांजलेल्या, दु:खी, कष्टी जनतेच्या मनात या राजमुद्रेद्वारे निर्माण केला.

राजमुद्रेवरील हे शब्द पाहता,  शहाजी राजांचे विचार सहज लक्षात येतात. मुद्रेतील प्रत्येक शब्द विचारपूर्वक मांडण्यात आला होता. ज्या माध्यमातून महाराजांचे भविष्यातील ध्येय आणि त्यांच्या हेतूंची निश्चिती करण्यात आली होती.