मनसेचा नवा झेंडा पाहिलात का?

राज ठाकरे यांनी या झेंड्याचे अनावरण केल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

Updated: Jan 23, 2020, 10:52 AM IST
मनसेचा नवा झेंडा पाहिलात का? title=

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईत पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण केले. गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळासह अनेकांना या झेंड्याविषयी उत्सुकता होती. अखेर आज या झेंड्याचे अनावरण झाले. भगव्या रंगाच्या या झेंड्यावर शिवरायांच्या राजमुद्रेची प्रतिमा आहे. राज ठाकरे यांनी या झेंड्याचे अनावरण केल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

या नव्या झेंड्याबरोबरच मनसे आगामी काळात आपल्या राजकारणाची दिशाही बदलणार आहे. आता मनसे हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन राजकारण करेल. अधिवेशनाच्या व्यासपीठावर स्वातंत्र्यवीर सावरकरांची मांडलेली तसबीर याचेच संकेत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. 

दरम्यान, मनसेकडून आज नव्या झेंड्याचे अनावरण झाले असले तरी यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मनसेने छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा राजकारणासाठी वापरल्यास आमच्या स्टाइल आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला होता. तसेच निवडणूक आयोगाकडूनही या झेंड्याला परवानगी मिळेल का, याबद्दल अद्याप साशंकता आहे. 

आजच्या अधिवेशनात मनसेकडून आगामी रणनीतीवर चर्चा करण्यात येईल. शिवसेनेने राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साथीने धर्मनिरपेक्ष सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनसेला हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन नव्याने वाटचाल करण्यासाठी राजकीय स्पेस उपलब्ध झाली आहे. अशावेळी मनसेला भाजपची साथ मिळू शकते. काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची गुप्त बैठक झाली होती. त्यामुळे आजच्या भाषणात राज ठाकरे यावर काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.