Crime News: मुंबईतील वरळी येथे 19 मार्च झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला होता. 57 वर्षीय राजलक्ष्मी रामकृष्णन (Rajalakshmi Ramakrishnan) जॉगिंगसाठी गेल्या असता कारने दिलेल्या धडकेत त्या ठार झाल्या होत्या. राजलक्ष्मी रामकृष्णन या एका टेक कंपनीच्या सीईओ होत्या. पोलिसांनी याप्रकरणी चालक सुमेर मर्चंचा याला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी कोर्टात चार्जशीट (Chargesheet) दाखल केली आहे. यामध्ये आरोपी चालक सुमेर मर्चंट (Sumer Merchant) याचा जबाब सामील करण्यात आला आहे. त्यानुसार त्याने आपण मद्यप्राशन केलं नव्हतं असा दावा केला आहे. तसंच त्या दिवशी नेमकं काय झालं होतं हे सांगितलं आहे.
सुमेर मर्चंट याने पोलिसांना आपण अपघाताच्या काही तास आधी मित्रांसह पार्टी केली होती, पण मद्यप्राशन केलं नव्हतं असा दावा केला आहे. सुमेर मर्चंट याने पोलिसांकडे आपला जबाब नोंदवला आहे. पोलिसांनी नुकतीच कोर्टात चार्जशीट दाखल केली असून, त्यात हा जबाब सामील केला आहे. दरम्यान, चार्जशीटमध्ये सुमेर मर्चंटच्या रक्तचाचणीचा अहवालही जोडण्यात आला आहे. त्यानुसार त्याच्या रक्तात अल्कोहोलचे प्रमाण 100 मिलीमध्ये 137 मिलीग्राम होते, जे परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आहे.
राजलक्ष्मी रामकृष्णन या 19 मार्चच्या सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. त्यावेळी वेगाने धावणाऱ्या कारने त्यांना धडक दिली होती. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. राजलक्ष्मी रामकृष्णन एका टेक कंपनीच्या सीईओ असल्याने हे एक हाय-प्रोफाइल प्रकरण झालं होतं.
सुमेर मर्चंटने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं आहे की, आपण कामाच्या निमित्ताने 15 दिवसांसाठी अमेरिकेत गेलो होतो. 15 मार्चला आपण पुन्हा भारतात परतलो होतो. घरी परतल्यानंतर आपण शाळेतीलआणि ऑफिसमधील मित्रांना भेटण्यास गेलो होतो. यावेळी 18 मार्चला पार्टी करण्याच ठरलं. यानंतर आम्ही कमला मिल्समधील रेस्तराँमध्ये गेलो होतो.
सुमेर मर्चंटच्या दाव्यानुसार, पार्टीत त्याच्या मित्रांनी मद्यप्राशन केलं होतं पण त्याने केलं नव्हतं. "माझ्या काही मित्रांनी मद्यप्राशन केलं होतं. पण माझी झोप नीट पूर्ण होत नसल्याने माझी मद्यप्राशन करण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे मी दारु प्यायलो नाही," असं त्याने सांगितलं आहे.
19 मार्चला रात्री 1.30 वाजता रेस्तराँ बंद झाल्यानंतर सुमेर मर्चंट मित्रासंह घरी आला होता. सुमेर मर्चंटच्या दाव्यानुसार, आपण एका मित्राला घरी सोडण्यास जात होतो. यावेळी वरळी डेअरीपासून पुढे जात असताना एक महिला अचानक कारसमोर आली. "मी कार नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला आणि उजव्या बाजूला वळवली. पण वेगात असल्याने ते शक्य होऊ शकलं नाही. त्यामुळे महिला माझ्या कारमसोर आली आणि कार जाऊन दुभाजकावर आदळली," असं सुमेर मर्चंटने सांगितलं आहे.
जेव्हा आरोपी कारमधून खाली उतरले आणि महिलेकडे गेले तेव्हा ती पोटावर पडलेली होती आणि श्वास थांबला होता. सुमेर मर्चंटच्या माहितीनुसार, पोलीस काही वेळात पोहोचले आणि महिलेला नायर रुग्णालयात घेऊन गेले.
या अपघाताचे साक्षीदार सिल्वेस्टर पेरेरिया आणि कुणाल रुमडे यांनी आम्ही रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गाडी पार्क केली होती असं सांगितलं आहे. कार प्रचंड वेगात होती आणि आरोपी नशेत दिसत होता असं त्यांनी पोलिसांना सांगितलं आहे.
जेव्हा सुमेर मर्चंटने महिलेला पाहिलं तेव्हा ती जखमी अवस्थेत होती. त्याने आपल्या मित्राला निघून जाण्यास सांगितलं. पण आम्ही त्यांना थांबवलं आणि पोलीस, रुग्णवाहिकेला फोन केला अशी माहिती त्यांनी दिली आहे.
दरम्यान सुमेर मर्चंटने चार्जशीट दाखल झाल्यानंतर जामीन मिळण्यासाठी कोर्टात नव्याने याचिका दाखल केली आहे. 31 मे रोजी याचिकेवर सुनावणी होणार आहे.