Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा 'आखाडा' जिंकण्यासाठी घोडेबाजार?

 भाजपनं सत्ताधारी महाविकास आघाडीची ऑफर धुडकावून लावल्यानं, आता येत्या १० जूनला राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होणाराय.  

Updated: Jun 3, 2022, 10:59 PM IST
Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा 'आखाडा' जिंकण्यासाठी घोडेबाजार? title=

मुंबई :  भाजपनं सत्ताधारी महाविकास आघाडीची ऑफर धुडकावून लावल्यानं, आता येत्या १० जूनला राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होणाराय. ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सत्ताधारी आघाडीनं केला. मात्र भाजपनं ही ऑफर सपशेल धुडकावून लावली. (rajya sabha election 2022 inc ncp bjp shiv sena 6 post and 7 candidate who will win know political scenario)

राज्यसभेसाठी घोडेबाजार?

राज्यसभेच्या ६ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात असल्यानं आता येत्या १० जूनला राज्यसभेची निवडणूक होणाराय. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. 

राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याच्या बदल्यात महाविकास आघाडीनं विधान परिषदेची एक जादा जागा भाजपला सोडण्याची तयारी दर्शवली.पण भाजपनं सत्ताधारी आघाडीचा ही ऑफर धुडकावून लावली.

त्यामुळं आता सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार विरुद्ध भाजपचे धनंजय महाडिक या दोन कोल्हापूरकर पैलवानांमध्ये राजकीय कुस्तीचा आखाडा रंगणाराय.

या निवडणुकीत छोटे पक्ष आणि अपक्ष आमदार कुणाच्या पारड्यात कौल टाकतात, यावर विजयाचं गणित अवलंबून आहे.. त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी बाजूनं जोरदार घोडेबाजार रंगण्याची शक्यता आहे. 

सरकार अस्थिर करण्यासाठीच भाजपनं निवडणूक लादल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. राज्यसभा निवडणुकीत दगाफटका होण्याची भीती महाविकास आघाडीला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

बहुमत सिद्ध करताना महाविकास आघाडीकडं 169 आमदार होते. सरकारच्या बाजूनं अजूनही तेवढे आमदार आहेत का, याचा फैसला निवडणुकीत होणाराय. शिवसेनेला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी अपक्ष आणि छोट्या पक्षांची मनधरणी करावी लागणाराय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर सत्ताधारी आमदारच नाराज आहेत. त्यामुळं दगाफटका होण्याची भीती आघाडीला वाटतेय, असं सूत्रांनी सांगितलं. पक्षाच्या आमदाराला आपलं मत प्रतोदाला दाखवावं लागतं. मात्र मतदान बाद करण्याच्या आयडिया अनेक आमदारांना माहित असल्यानं त्याचा फटका आघाडीला बसू शकतो

उत्तर प्रदेशातील इम्रान प्रतापगढींना उमेदवारी दिल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी आहे. आघाडीतली हीच नाराजी उघड करण्याची आणि अपक्ष तसंच छोट्या पक्षाच्या आमदारांची मतं फोडण्याची रणनीती भाजपनं आखल्याचं समजतंय.

संजय पवारांच्या तुलनेत धनंजय महाडिक हे धनवान उमेदवार आहेत. त्यामुळंच भाजपच्या दिल्ली हायकमांडनं राज्यसभा निवडणुकीच्या निमित्तानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच थेट आव्हान दिलंय.  हे आव्हान मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी कसं पेलणार, याचा फैसला १० जूनला होणाराय.