रवी राणा यांनी सांगितलं मातोश्रीसमोर हनुमान चालिसा वाचल्याने राज्याला 'हा' फायदा होणार

उद्धव ठाकरे जेव्हापासून मुख्यमंत्री (CM Udhav Thackeray) झाले तेव्हापासून...  पाहा काय बोलले रवी राणा

Updated: Apr 22, 2022, 03:47 PM IST
रवी राणा यांनी सांगितलं मातोश्रीसमोर हनुमान चालिसा वाचल्याने राज्याला 'हा' फायदा होणार title=

मुंबई : उद्धव ठाकरे जेव्हापासून मुख्यमंत्री (CM Udhav Thackeray) झाले तेव्हापासून महाराष्ट्रात (Maharashtra) हाहाकार माजला आहे. शेतकऱ्याची परिस्थिती खराब आहे. बेरोजगारी वाढली आहे. विकास थांबला आहे. त्यामुळे त्याचं विघ्न संपवण्यासाठी त्यांनी हनुमान चालिसा वाचणं गरजेचं आहे, असं आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत पत्रकार परिषद घेत आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती आरोप केले

महाराष्ट्रावर ज्या पद्धतीने संकटं सुरु आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भात येत नाहीत. विदर्भाच्या शेतकऱ्याच्या बांधावर जात नाहीत. शेतकऱ्याला कुठल्या प्रकारची मदत करत नाहीत. मंत्रालयात दोन-दोन वर्ष जात नाहीत. कुठेतरी ज्या पद्धतीने विकास थांबलेला आहे. शेतकऱ्याची परिस्थिती बिकट आहे, विकास थांबलेला आहे, औद्योगिस विकास थांबलेला आहे, बेरोजगारी वाढत आहे. या उद्देशाने या संकटातून मुक्त होण्यासाठी हनुमान चालिसाचं वाचन केलं पाहिजे, अशा प्रकारची विनंती केली.

'उद्धव ठाकरे हिंदुत्व विसरले'
ज्या ठिकाणी  बाळासाहेबांची श्रद्धा आणि मातोश्री आपण हृदयामध्ये ठेवतो हिंदुंच्या नावाने त्या ठिकाणी हनुमान चालिसाला विरोध होत असेल तर मला असं वाटतं, की उद्धव ठाकरे हिंदुत्व विसरले आहेत. आणि हिंदुत्वाची दिशा सोडून ते दुसऱ्याच दिशेला जाऊन या महाराष्ट्राचं वाटोळं करत आहे. अशी टीका रवी राणा यांनी केली आहे.

महाराष्ट्रावरची साडेसाती संपवण्यासाठी हनुमान चालिसा
म्हणून महाराष्ट्रावर जे विघ्न आलेलं आहे, जी साडेसाती महाराष्ट्रात सुरु झालेली आहे, त्यामुळे हे विघ्न संपवण्यासाठी हनुमान चालीसा वाचली पाहिजे, असं रवी राणा यांनी म्हटलं आहे. 

उद्धव ठाकरेंना हिंदुत्त्वाचा विसर
ज्या हिंदुत्नाच्या भरवश्यावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, ज्या हिंदुत्वाचं नाव घेऊन ते मतं मागतात, त्या हिंदुत्वाचा विरोध करुन त्यांना सत्तेचा लोभ आलेला आहे आणि बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडलेला आहे तो विचार जागृत करण्यासाठी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसाचं पठण करणार आहोत. यावर आम्ही ठाम आहोत. 

बाळासाहेब आज असते तर एकवेळा नाही तर शंभर वेळा हनुमान चालीसा वाचायची आम्हाला परवानगी दिली असती, आणि आमचं स्वागतही केलं असतं असा टोला रवी राणा यांनी लगावला आहे.

मोदींचा फोटो वापरुन मतं
सत्तेवर असलेली शिवसेना भाजपच्या  भरवशावरच आहे. मोदींचा फोटो वापरुन त्यांनी मतं मागितली. भाजपवर खापर फोडून आम्हाला बदनाम करु नये, आम्ही स्वतंत्र आहोत. मी अपक्ष आमदार आहे, नवनीत राणा अपक्ष खासदार आहे. त्यामुळे हिंदुत्वचं नाव घेण्यासाठी आम्हाला शिवसेना किंवा उद्धव ठाकरे थांबवू शकणार नाही.