मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड समूहाच्या सोमवारी मुंबईत झालेल्या ४२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी यांनी उद्योगसमूहाच्या भविष्यातील वाटचालीविषयी अनेक मोठ्य़ा घोषणा केल्या. यावेळी त्यांनी रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून देशात सर्वाधिक मोठी परकीय गुंतवणूक होणार असल्याचे जाहीर केले. ही केवळ रिलायन्स नव्हे तर देशाच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी परकीय गुंतवणूक असेल.
त्यासाठी रिलायन्सने सौदी अराम्को या कंपनीशी खनिज तेलापासून रसायने तयार करण्याच्या क्षेत्रात दीर्घकालीन भागीदारीचा करार केला आहे. त्यानुसार सौदी अराम्को ७५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करून रिलायन्समधील २० टक्के समभाग विकत घेणार असल्याचे मुकेश अंबानी यांनी जाहीर केले.
तसेच यावेळी मुकेश अंबानी यांनी जिओ ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम झाल्याचे सांगितले. तसेच देशात सर्वाधिक ग्राहकसंख्येचा विचार करता जिओचा जगात दुसरा क्रमांक लागतो. रिलायन्सकडून जिओमध्ये ३.५ लाख कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. यापैकी १.२५ लाख कोटी ठोस पायाभूत सुविधांसाठी खर्च केले जातील. जिओ आता ५ जी सेवेसाठी सज्ज आहे. आम्ही कमीतकमी खर्चात ५ जी नेटवर्कसाठी अपग्रेड होऊ शकतो, असे अंबानी यांनी म्हटले.
तसेच आगामी वर्षात रिलायन्सकडून आणखी काही करार केले जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेची उलाढाल ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. माझ्या मतानुसार २०३० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था १० ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार करेल. मी डिजिटल क्षेत्रातील विकासामुळे वाढणारे सकल राष्ट्रीय उत्पन्न लक्षात घेऊन हे बोलत आहे. सध्या भारतीय अर्थव्यवस्थेतील आलेली मंदी तात्पुरती आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.