परेलच्या 'क्रिस्टल टॉवर'ला भीषण आग, काही रहिवाशांची सुखरुप सुटका

 'क्रिस्टल टॉवर' ही सोळा मजल्यांची इमारत आहे

Updated: Aug 22, 2018, 10:06 AM IST

मुंबई : मुंबईत परेल भागातील क्रिस्टल टॉवर या इमारतीला भीषण आगीनं घेरल्याचं वृत्त हाती येतंय. 'क्रिस्टल टॉवर' ही सोळा मजल्यांची रहिवासी इमारत आहे. त्यातील बाराव्या मजल्यावर आग लागल्याचं समजतंय. आगीचं वृत्त हाती येताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. डॉ. आंबेडकर रोडला लागून ही इमारत आहे.  

इमारतीत अडकलेले नागरिक गॅलरीत येऊन मदतीसाठी याचना करताना दिसत आहेत. या इमारतीत अनेक जण अडकून पडले आहेत. त्यातील काही नागरिकांना वाचवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलंय. टॉवरच्या बाराव्या मजल्यावरून आगीचे लोळ बाहेर पडताना दिसत आहेत.  

आग पसरल्यामुळे लिफ्ट बंद करण्यात आली आहे. जिन्यांवरही धूर पसरला आहे. खालचे मजले तातडीनं रिकामे करण्यात आलेत. अग्निशमन दलाचे जवान वर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. आग पसरू नये याची काळजी घेतली जातेय. 

कोणत्याही जीवितहानीविना या इमारतीतील अडकलेल्या नागरिकांची सुखरुप सुटका करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.