समीर वानखेडेंच्या कुटुंबियांना सोशल मीडियावरुन धमकी; पोलिसांकडे विशेष सुरक्षेची मागणी

Aryan Khan drugs case : मुंबई एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या पत्नीला धमकी दिल्याची बातमी समोर आली आहे. स्वतः समीर वानखेडे यांनी ही माहिती दिली. कोणीतरी मला आणि माझ्या पत्नीला धमकावण्याचा प्रयत्न करत आहे आणि घाणेरडे मेसेज पाठवत असल्याचे त्यांनी सांगितले.

आकाश नेटके | Updated: May 22, 2023, 01:31 PM IST
समीर वानखेडेंच्या कुटुंबियांना सोशल मीडियावरुन धमकी; पोलिसांकडे विशेष सुरक्षेची मागणी title=
(फोटो सौजन्य - PTI)

Mumbai News : मुंबई एनसीबीचे (NCB) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची गेल्या चार दिवसांपासून सीबीआय (CBI) चौकशी सुरु आहे. आर्यन खान (Aryan Khan) ड्रग्ज प्रकरणात 25 कोटींची लाच मागितल्या प्रकरणी सीबीआयकडून वानखेडे यांची चौकशी सुरु आहे. दुसरीकडे समीर वानखेडे हे मुंबई पोलीस (Mumbai Police) आयुक्तांकडे विशेष सुरक्षेची मागणी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावरुन सातत्याने धमक्या येत असल्यामुळे विशेष सुरक्षेची मागणी करणार असल्याचे समीर वानखडे यांनी म्हटलं आहे.

नुकतेच समीर वानखेडे आणि शाहरुख खान यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. व्हॉट्सअॅप चॅटमध्ये शाहरुख खान आर्यनला तुरुंगात पाठवू नका असे सांगत असल्याचा दावा करण्यात आला आहे. अशातच, आता समीर वानखेडेने आणखी एक खळबळजनक दावा करत आपल्याला आणि पत्नीला धमक्या येत असल्याचा आरोप केला आहे.

मला आणि माझी पत्नी क्रांती रेडकरला गेल्या चार दिवसांपासून सोशल मीडियावर धमक्या आणि अश्लील मेसेज येत आहेत, असे समीर वानखेडे म्हणाले. "गेल्या चार दिवसांपासून मला धमक्या येत आहेत. याची माहिती मी पोलीस आयुक्तांना देणार आहे. जे काही आहे ते मी चौकशीमध्ये सांगणार आहे. सुरक्षेची खूपच समस्या आहे. जे काही आहे ते पत्राद्वारे पोलीस आयुक्तांना कळवणार आहे. सोशल मीडियावर सातत्याने धमक्या येत आहेत," अशी माहिती समीर वानखेडे यांनी दिली आहे.

सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर समीर वानखेडे यांनी त्यांच्या याचिकेत वरिष्ठांच्या आदेशानुसार काम केल्याचे नमूद केले आहे. या चॅट्समध्ये शाहरुख खान समीरला आर्यनला तुरुंगात न पाठवण्याचे आणि त्याच्याशी फोनवर बोलण्याचे आवाहन करताना दिसत होते. "शाहरुख खानसोबत झालेल्या चॅटिंगची माहिती वरिष्ठांना दिली होती. एनसीबीच्या महासंचालकांना याबाबत माहिती दिली होती, असा धक्कादायक खुलासा समीर वानखेडे यांनी केला आहे. गरज भासल्यास मुंबई हायकोर्टात याबाबत शपथपत्र दाखल करणार आहे," असेही समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे एनसीबीच्या अधिकार्‍यांनी रविवारी सांगितले की समीर वानखेडे यांनी अभिनेता शाहरुख खानशी आर्यन खानच्या अटकेबाबत केलेले चॅट शेअर करून नियमांचे उल्लंघन केले आहे. वानखेडे आणि शाहरुख यांच्यातील चॅट हा बॉलीवूड अभिनेत्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सीबीआयने त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविल्यानंतर दिलासा देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अधिकाऱ्याने दाखल केलेल्या याचिकेचा भाग होता.