Jayant Patil ED Enquiry: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP Jayant Patil) यांची आज सक्तवसुली संचलनालयाकडून (Enforcement Directorate) चौकशी केली जाणार आहे. जयंत पाटील यांना ईडीने काही दिवसांपूर्वी चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. यानंतर आज जयंत पाटील चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. दरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालय आणि ईडीच्या कार्यालयाबाहेर तुफान गर्दी केली आहे. राष्ट्रवादीचे अनेक मोठे नेतेही यावेळी उपस्थित होते.
जयंत पाटील यांची इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेसशी (IL&FS) संबंधित कथित गैरव्यवहाराबाबत ईडीकडून चौकशी (ED Inquiry) होणार आहे. कोहिनूर सीटीएनएलमधील IL&FS समूहाच्या इक्विटी गुंतवणुकीशी संबंधित ही चौकशी आहे. जयंत पाटील यांना ईडीने दुसऱ्यांदा चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. त्यानंतर आज ते ईडी अधिकाऱ्यांसमोर चौकशीसाठी उपस्थित राहणार आहेत.
ईडी कार्यालयात जाण्याआधी जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की "मला जी नोटीस पाठवण्यात आली आहे, त्यावर कोणताही विषय लिहिण्यात आलेला नाही. पण तिथे एक फाईल क्रमांक लिहिण्यात आला आहे. त्यावर IL&FS चा उल्लेख आहे. त्याबद्दल मला काही माहिती नाही. माझा कधीच IL&FS शी संबंध आलेला नाही. त्यांना काय माहिती हवी याची मला माहिती नाही. पण त्यांना जी माहिती हवी असेल ती मी देईन. कायदा पाळणारा नागरिक या हेतूने मी त्यांना चौकशीत पूर्ण सहकार्य करणार आहे. त्यांच्या सर्व प्रश्नांची मी उत्तरं देईन".
आज सकाळी ११ वाजता मी ईडी कार्यालयात उपस्थित राहणार आहे. ईडीचे समन्स आल्यापासून मला राज्यभरातून माझ्या पक्षातील व इतर मित्र पक्षांतील पदाधिकाऱ्यांचे फोन येत असून राज्यभरातून लोक आज ईडी कार्यालयाबाहेर येत असल्याचे मला समजत आहे.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) May 22, 2023
माझं यासंबंधी शरद पवारांशी काही बोलणं झालेलं नाही अशी माहिती यावेळी जयंत पाटील यांनी दिली. "मला अनेक लोकांचे फोन आले. मीडियाच्या माध्यमातून त्यांना अधिक माहिती मिळाली असेल," असंही त्यांनी सांगितलं.
#WATCH | Mumbai: Maharashtra NCP President Jayant Patil reaches ED office.
ED to question Jayant Patil in connection with the alleged IL & FS scam pic.twitter.com/sf7N2fjIcl
— ANI (@ANI) May 22, 2023
"माझ्या नावावर एकही घर नाही. सांगलीतील घर वडिलांच्या नावाने होते. त्यांच्या पश्चात ते घर आईच्या नावावर झाले असून आता आईच्या पश्चात नाव बदलण्याचे काम सुरू आहे. कासेगावमध्ये थोडीफार शेती आहे. मात्र, वाटण्या झालेल्या नाहीत. सत्ताधारी पक्षाच्या विरोधात बोलणार्यांना अडकविण्याचे काम सध्या सुरू असून मी अशा चौकशीला भिण्याचे कोणतेच कारण नाही," असे जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं.
जयंत पाटील यांच्या ओळखीच्या काही संस्थांना आयएल अँड एफएस प्रकरणातील कंपन्यांनी कमिशन रक्कम दिल्याचा आरोप ईडीचा आहे. त्यामुळे ईडीला आता त्यांची चौकशी करायची आहे. मात्र या कंपनीशी आपला संबंध नसल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले आहे.