मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासोबतच्या भेटीमुळे आज शिवसेना नेते संजय राऊत चांगलेच चर्चेत होते. या भेटीनंतर संजय राऊत यांनी आणखी एका मिष्किल टिप्पणीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राज्यपालांना भेटून बाहेर पडल्यानंतर प्रसारमध्यमांच्या प्रतिनिधींनी संजय राऊत यांना घेरले. त्यावेळी राऊत यांनी पत्रकारांना लांब राहण्याची सूचना केली. त्यांनी म्हटले की, अजित पवार काल म्हणालेत बूम (माईक) लांब ठेवा. त्याने कोरोना होतो, असे 'डॉक्टर' अजित पवारांनी सांगितले आहे. यावेळी त्यांनी डॉक्टर शब्दावर विशेष जोर दिला. त्यामुळे पत्रकारांमध्ये अजितदादांच्या अशा उल्लेखाविषयी चर्चा रंगली होती. आता राऊत यांचे वक्तव्य केवळ गंमत होती की टोमणा, हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
मीडियाचा बूम बघून अजित पवारांची धूम
काल अजित पवार यांनी पुण्याच्या स्मार्ट सिटी कार्यालयात उभारलेल्या वॉर रुमला भेट दिली होती. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करुन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला होता. यानंतर अजितदादा नेहमीप्रमाणे प्रसारमाध्यमांशी बोलतील या आशेने पत्रकार त्यांच्यापाशी माईक घेऊन गेले. तेव्हा अजितदादांनी त्यांना दुरुनच नमस्कार केला. तसेच बूम (माईक) जवळ आणू नका, असे त्यांनी पत्रकारांना बजावले. त्याने कोरोना होतो, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले. यानंतर अजित पवार प्रसारमाध्यमांशी न बोलता पुढच्या बैठकीसाठी रवाना झाले होते.
राज्यपाल आणि संजय राऊतांचे 'मनोमीलन'; कटुता संपली
दरम्यान, संजय राऊत यांनी आज राज्यपालांची घेतलेली भेट अनेकांसाठी अनपेक्षित होती. विधानपरिषद निवडणुकीवेळी झालेल्या शाब्दिक युद्धामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि संजय राऊत यांच्यात वितुष्ट निर्माण झाल्याची चर्चा होती. संजय राऊत यांच्या बोचऱ्या टीकेमुळे राज्यपाल दुखावले गेले होते. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन या कटुतेला तिलांजली दिल्याचे सांगितले जाते.राज्यपाल आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आहेत. त्यांचे आणि माझे खूप जुने संबंध आहेत. खूप दिवस त्यांना भेटलो नव्हतो. त्यामुळे आज त्यांची सदिच्छा भेट घेतल्याचे राऊत यांनी सांगितले.