मीडियाचा बूम बघून अजित पवारांची धूम

म्हणाले, ‘बूम जवळ आणू नका, त्याने कोरोना होतो!’

Updated: May 22, 2020, 05:39 PM IST
मीडियाचा बूम बघून अजित पवारांची धूम

अरुण मेहेत्रे, पुणे : सध्या कोरोनाच्या संकटात मुंबई-पुणे फिरत काम करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीडियापासून मात्र दो गज दूरी ठेवली आहे. प्रशासनासोबत बैठका घेऊन उपाययोजना आणि सूचना करणारे अजित पवार मीडियापासून दूर आहेत. आज पुण्यातही त्याचा प्रत्यय आला.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यात होते. पुण्याच्या स्मार्ट सिटी कार्यालयात उभारलेल्या वॉर रुमला भेट देऊन त्यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. महापालिका अधिकाऱ्यांनी केलेले सादरीकरण आटोपल्यानंतर ते मीडियाशी बोलतील म्हणून पत्रकारही त्यांची वाट पाहत होते. बैठक आटोपल्यानंतर अजित पवारांना भेटण्यासाठी पत्रकार गेले, पण त्यांनी दूर राहूनच नमस्कार केला. आणि सविस्तर बोलण्यास नकार दिला. त्यांच्याशी झालेला संवाद असा होता.

प्रश्न - मीडियाशी कधी बोलणार?

अजित पवार - कोरोना संपल्यावर….

प्रश्न - दोन मिनिटे बोला..

अजित पवार - जो माणूस महिना महिना इथं येत नाही. तो काय बोलणार? (पुण्याकडे पालकमंत्री अजित पवार यांचं दुर्लक्ष झाल्याचा आरोप खासदार गिरीश बापटांनी आरोप केला होता. त्या संदर्भाने अजित पवारांचे हे उत्तर होते.)

प्रश्न - स्थिती कंट्रोल मध्ये आहे का?

अजित पवार - म्हैसेकर रोज प्रेस घेऊन सांगतात.

(आणि बुम जवळ नेताच)

अजित पवार -  हो, ते जवळ आणू नका. त्यानं कोरोना होतो...

बूम जवळ नेताच अजितदादांनी मीडियापासून धूम ठोकली आणि ते पुढच्या बैठकीला निघून गेले.

कोरोनाच्या संकटात अजित पवार व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करून आढावा घेत असतात. त्यामुळे मीडियाशी त्यांचा संबंध फारसा येत नाही. पण पुण्यात बैठकीला आल्यानंतरही त्यांनी मीडियाशी अंतर ठेवूनच आहेत, हे आज पुन्हा एकदा दिसले.