भेटीनंतर लोकांची उत्सुकता आणखीच वाढवून पवार काका-पुतण्या निघून गेले

पवारांशी चर्चा केल्यानंतर दोन तासांनी बाहेर आलेल्या अजित पवार यांना पत्रकारांनी गाठलं

Updated: Sep 28, 2019, 02:41 PM IST
भेटीनंतर लोकांची उत्सुकता आणखीच वाढवून पवार काका-पुतण्या निघून गेले title=

मुंबई : राजीनाम्यानंतर तब्बल २० तास गायब राहिल्यानंतर आज शरद पवार यांचे पुतणे अजित पवार मुंबईत प्रकटले. भाऊ श्रीनिवास पवार आणि मुलगा पार्थ पवार यांच्यासोबत त्यांनी शरद पवारांचं निवासस्थान 'सिल्व्हर ओक' गाठलं. यावेळी सुप्रिया सुळेही चर्चेसाठी उपस्थित होत्या. मात्र या भेटीदरम्यान रोहीत पवार आणि त्यांचे वडील राजेंद्र पवार यांचा समावेश नव्हता. इथं जवळपास दोन तास काका-पुतण्यामध्ये बंद दाराआड चर्चा सुरू होती. विशेष म्हणजे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यासहीत राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनाही यावेळी चर्चेत सामील करून घेण्यात आलं नव्हतं. हे नेते 'सिल्व्हर ओक'च्या बाहेरच उभे होते. 

पवारांशी चर्चा केल्यानंतर दोन तासांनी बाहेर आलेल्या अजित पवार यांना पत्रकारांनी गाठलं. यावेळी त्यांना त्यांच्या राजीनाम्याचं कारण विचारण्यात आलं. तसंच अजित पवार नाराज आहेत का? नाराजीचं कारण काय? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती त्यांच्यावर करण्यात आली. 

यावेळी अजित पवार यांनी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं. 'आज दुपारी धनंजय मुंडे यांच्या घरी पत्रकार परिषदेत मी माझं म्हणणं मांडेन' असं म्हणत ते तिथून निघून गेले. 

तर, याच मुद्यावर बोलताना 'तुम्हाला जे काही ऐकायचंय ते अजित पवार यांच्या तोंडूनच ऐका' असं उत्तर शरद पवार यांनी दिलंय. यावेळी, 'ऑल इज वेल?' असा प्रश्न पवारांना केला गेला. यावर त्यांचं उत्तर होतं 'तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून वाटतं का की काही झालंय?'

त्यामुळे अजित पवार यांच्या राजीनाम्याबाबतची लोकांची उत्सुकता आणखीनच वाढलीय.