शरद पवार मुंबईत भाजप अध्यक्ष आशिष शेलारांच्या घरी भेटीला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज संध्याकाळी अचानक भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

Jaywant Patil Updated: Apr 10, 2018, 07:45 PM IST

दीपक भातुसे, दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज संध्याकाळी अचानक भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. ही भेट अनौपचारिक असल्याचं सांगितलं जातंय. मात्र मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीएमधील राजकारण या भेटी मागे असण्याची शक्यता आहे.गेल्या काही दिवसात शरद पवार यांच्या वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांशी झालेल्या भेटीगाठी चर्चेत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पवारांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. आता शरद पवार भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी जाऊन आले, त्यापूर्वी आशिष शेलार यांनी महिनाभरापूर्वी बारामतीला जाऊन पवारांची भेट घेतली होती. 

पवारांच्या मनात चाललंय तरी काय?

या सर्व राजकीय भेटीगाठीने पवारांच्या मनात चाललंय तरी काय?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आशिष शेलार एमसीएचे अध्यक्ष आहेत. लोढा समितीच्या शिफारसीनुसार त्यांना हे अध्यक्षपद सोडावे लागणार आहे.  सध्या न्यायालयाने एमसीएवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आलीय. 16 एप्रिल रोजी एमसीएची घटनात्मक दुरुस्तीसाठी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. वाद, आरोप प्रत्यारोप यामुळे ही सभा वादळी होण्याची चिन्ह आहेत. 

या भेटीत चर्चा झाली असण्याची शक्यता

प्रशासकांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. याबाबत या भेटीत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे एमसीएची निवडणूक जून-जुलैमध्ये होण्याची शक्यता असून या निवडणुकीत शक्तिशाली बाळ महाडदळकर पॅनलचे अध्यक्ष पदाचे उमेदवार कोण?, यावरही या भेटीत खलबतं झाली असण्याची शक्यता आहे. 
एमसीएवर प्रशासक नेमल्याने आयपीएल सामन्यांच्या तिकीट वाटपावरूनही एमसीएमध्ये खूप वाद सुरू आहे. यंदा कुठल्याही सदस्याला सामन्यांची तिकीटं उपलब्ध होत नसल्यामुळे एमसीए  कार्यकारिणीत प्रचंड नाराजी आहे. यातून मार्ग काढण्याबाबत आशिष शेलार यांनी पवारांकडून मार्गदर्शन घेतलं असण्याची चिन्हं आहेत.