शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांनी राज्यपालांची भेट पुढे ढकलली

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेत्यांनी राज्यपाल यांची  भेट पुढे ढकलली आहे. 

Updated: Nov 16, 2019, 04:34 PM IST
शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांनी राज्यपालांची भेट पुढे ढकलली  title=

मुंबई : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेत्यांनी राज्यपाल भगतिसिंग कोश्यारी यांची  भेट पुढे ढकलली आहे. शिवमहाआघाडीचे नेते राज्यपालांना भेटणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. काही कारणास्तव ही भेट लांबणीवर पडली आहे. दरम्यान, पुढील तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पुण्यात नेत्यांची बैठक घेणार आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक बोलावल्याची माहिती देण्यात आली आहे.

शिवमहाआघाडीची भेट नाकरण्याचे कारण देण्यात आले आहे. निवडणूक खर्च सादर करण्याचे शेवटचे दोन दिवस शिल्लक असल्याने बहुतांश नेते त्यात व्यस्त आहेत. त्यामुळे ही भेट पुढे ढकलण्याची विनंती काँग्रेसकडून करण्यात आली होती. त्यानुसार भेट पुढे ढकलण्यात आली आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आज दुपारी तीन वाजता राज्यपालांची भेट घेणार होते. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी या भेटीत करण्यात येणार होती. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. मात्र मदतीबाबत अजून ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीवर अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी या भेटीत करण्यात येणार होती.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे सरकारी कामकाज जवळपास बंदच आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांना तातडीने मदत मिळावी, या मागणीसाठी ही भेट होती. अवकाळी पावसाचा फटका राज्यातील सर्वच भागातील शेतकऱ्यांना बसला आहे. काहीठिकाणी शेतकरी नुकसानीचे पंचनामे ही अजून पूर्ण झालेले नाही. त्यामुळे मदत मिळणार की नाही याची चिंता शेतकऱ्याला आहे. 

महाशिवआघाडीने अजूनही सत्तास्थापनेचा दावा केला नसला तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या तिन्ही पक्षाचे नेते एकत्र राज्यपालांची भेट घेणार होते. त्यामुळे या भेटीकडे लक्ष होते. आता ही भेट कधी होणार याची माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान मदत कधी मिळणार, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.