सकाळी लवकर उठा, तयार राहा; शिवसेनेच्या आमदारांना महत्त्वाची सूचना

बहुमताचा १४५ चा आकडा गाठण्यासाठी शिवसेनेकडून वेगवान हालचाली

Updated: Nov 10, 2019, 11:28 PM IST
सकाळी लवकर उठा, तयार राहा; शिवसेनेच्या आमदारांना महत्त्वाची सूचना title=

मुंबई: मढ आयलंडच्या 'द रिट्रीट हॉटेल'मध्ये असलेल्या शिवसेना आमदारांना सोमवारी सकाळी लवकर उठून तयार राहण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे उद्या दिवसभरात मुंबईत मोठ्या राजकीय हालचाली घडण्याचे संकेत मिळत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, उद्या सकाळी साधारण साडेनऊच्या सुमारास हॉटेल रिट्रीटमध्येच आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक होईल. या बैठकीला आदित्य ठाकरे उपस्थित असतील. यानंतर सत्तास्थापनेच्यादृष्टीने संख्याबळ दाखवण्यासाठी शिवसेनेचे नेते या आमदारांना घेऊन दुपारच्या सुमारास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊ शकतात. तसेच जयपूरमध्ये असलेले काँग्रेसचे आमदारही आज रात्री किंवा उद्या मुंबईत परततील. बहुमताचा १४५ चा आकडा गाठण्यासाठी शिवसेनेकडून या हालचाली सुरु असल्याचे सांगितले जाते. 

भाजपने सत्तास्थापनेस नकार दिल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी निवडणुकीतील दुसरा मोठा पक्ष असणाऱ्या शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी विचारणा केली आहे. त्यानुसार शिवसेनेला सोमवारी रात्री आठ वाजेपर्यंत राज्यपालांसमोर बहुमताची आकडेवारी सादर करावी लागेल. 

मुख्यमंत्रीपदाच्या पालखीत शिवसैनिकाला बसवणार- उद्धव ठाकरे

शिवसेनेकडे सत्तास्थापनेसाठीचे बहुमत असल्याची खात्री पटल्यानंतरच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी त्यांना सत्तास्थापनेचे निमंत्रण देतील. अन्यथा राज्यपाल वेगळ्या पर्यायाचा विचार करतील, असे सांगितले जात आहे.

...मग भाजपने इतका अट्टाहास कशासाठी केला- संजय राऊत

सध्या मातोश्रीवरील घडामोडींनाही वेग आला आहे. याठिकाणी शिवसेना नेत्यांची महत्त्वाची खलबते सुरु आहेत. इतके दिवस केवळ पडद्यामागे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा शिवसेनेला पाठिंबा असल्याची चर्चा होती. मात्र, आता शिवसेनेला प्रत्यक्षात हे सिद्ध करावे लागणार आहे. त्यामुळे अजूनही कुंपणावर बसून असलेल्या काँग्रेसशी वेगाने वाटाघाटी करून त्यांना पाठिंब्या देण्यासाठी राजी करणे, शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी उद्या शिवसेना नेते संजय राऊत दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.