महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी शिवसेना एनडीएतून बाहेर पडणार- राऊत

शिवसेना यासाठी पडेल ती किंमत मोजायला तयार आहे.

Updated: Nov 16, 2019, 04:55 PM IST
महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी शिवसेना एनडीएतून बाहेर पडणार- राऊत title=

मुंबई: शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (NDA)बाहेर पडण्याची केवळ औपचारिकताच शिल्लक राहिली आहे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. त्यांनी शनिवारी 'झी २४ तास'शी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, NDA मध्ये मालकशाही चालणार नाही. आम्ही महाराष्ट्राचा स्वाभिमान कायम ठेवण्यासाठी NDA मधून बाहेर पडत आहोत. आम्ही NDA मधून बाहेर पडलो नसतो तर राज्यातील जनतेने आम्हाला माफ केले नसते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न झाला. हे आम्ही सहन करणार नाही. त्यासाठी पडेल ती किंमत मोजायला शिवसेना तयार आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. 

संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे  भाजप आणि शिवसेना यांची ३० वर्षांची युती संपुष्टात आल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तर दुसरीकडे भाजपनेही शिवसेनेला हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या एनडीएच्या बैठकीचे निमंत्रण दिलेले नाही. 

याबद्दल शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते विनायक राऊत यांनी रोष व्यक्त केला. मुळात एनडीए ही बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारामुळे स्थापन झाली. त्या काळात शिवसेनेने साथ दिल्यामुळेच भाजपला आधार मिळाला. मात्र, आता भाजप NDA च्या निर्मात्यांनाच बाजूला ठेवत आहे. भाजपला या कर्माची फळ भोगावी लागतील, असा इशारा यावेळी राऊत यांनी दिला.