आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसाला शिवसेना नेत्यांचा 'हा' मास्टरप्लॅन

आदित्य ठाकरे वरळी, माहिम किंवा शिवडीमधून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

Updated: Jun 13, 2019, 10:11 AM IST
आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसाला शिवसेना नेत्यांचा 'हा' मास्टरप्लॅन title=

कृष्णात पाटील, झी २४ तास, मुंबई: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी शिवसेनेच्या सर्व नेत्यांना मातोश्रीवर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांच्याकडून सर्व आमदारांना हा निरोप देण्यात आल्याचे समजते. हे सर्व नेते आदित्य ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीला उभे राहण्याची गळ घालतील, अशी चर्चा सुरु आहे. 

गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे विधानसभा निवडणुकीला उभे राहणार असल्याची चर्चा सातत्याने सुरु आहे. शिवसेना आणि युवासेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी याला पाठिंबा दर्शवला होता. मात्र, ठाकरे कुटुंबीयांकडून याबाबत कोणताही खुलासा करण्यात आला नव्हता. अशातच आदित्य यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून शिवसेना नेत्यांकडून आदित्य यांची मनधरणी केली जाऊ शकते. त्यामुळे आता आदित्य ठाकरे या प्रस्तावाला होकार देऊन शिवसेना कार्यकर्त्यांना 'रिटर्न गिफ्ट' देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

आदित्य ठाकरे-दिशा पटनीच्या 'मैत्री'ची चर्चा

सूत्रांच्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे वरळी, माहिम किंवा शिवडीमधून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरेंनी वरळी आणि माहिम विधानसभा मतदारसंघातील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची दादरच्या सेनाभवनात बैठक घेतली होती. तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंसाठी वरळी विधानसभेची जागा सोडण्याची तयारी आमदार सुनिल शिंदे याआधीच दर्शवली आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आल्यास आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील, अशीही चर्चा सुरु झाली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जाहीरपणे तसे वक्तव्यही केले आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याच्या वाटाघाटी झाल्या होत्या. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचे काही नेते असे काही ठरलेच नव्हते, असे सांगत आहेत. या नेत्यांना संजय राऊत यांनी फटकारले होते. तसेच आदित्य ठाकरे हेच पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री असतील, असे ठणकावून सांगितले होते.