मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफी घोषणेची नेमकी स्थिती आणि ग्रामीण भागात पक्षाची बांधणी जाणून घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज एक बैठक बोलावलीय.
मुंबईत शिवसेना भवनात नेते आणि जिल्हाप्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख बैठकीत सामील होतील. दुपारी १२ वाजता होणारी ही बैठक पूर्व नियोजित आहे. पण, सध्या राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडी आणि काल पार पडलेल्या भाजप प्रदेश कार्यकारणी बैठकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या बैठकीला महत्त्व प्राप्त झालंय.
सरसकट कर्जमाफी म्हणजे राज्यात अराजकता माजविण्याचा डाव होता, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल त्यांच्या भाषणात मांडली होती. त्यावर उद्धव ठाकरे नेमकं काय भाष्य करतात? याकडेही लक्ष असणार आहे.
कर्जमाफीच्या घोषणेला आता जवळपास दीड महिना उलटून गेलाय, तरीही अद्याप शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झालेला नाही. सरकारला घोषणेची आठवण करून देण्यासाठी शिवसेनेनं अलिकडेच ग्रामीण भागात जिल्हा बँकापुढे ढोल वाजवण्याचं आंदोलनही केलं होते.
तसेच कर्जमाफीची मागणी आणि ग्रामीण भागात पक्ष संघटना बांधणीसाठी उद्धव ठाकरे यांनी टप्याटप्याने शिव संवाद दौराही केला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे भाजप सरकारची कोंडी करण्यासाठी आज आपल्या पदाधिकाऱ्यांना नेमका काय संदेश देतात याबाबत उत्सुकता असणार आहे. बैठकीनंतर ते प्रसार माध्यमांशी संवाद साधणार आहेत.