मुंबई : गेल्या चार वर्षात राज्य सरकारच्या कामगिरीचा आढावा घेण्याच्या उद्देशानं आज शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांची मुंबईत बैठक होतेय. या बैठकीत उद्धव ठाकरे स्वतः बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत. लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीनं शिवसेनेनं जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलीय. त्याचाच एक भाग म्हणून या बैठकीत विचार विनिमय होणार आहे.
युतीबाबत सध्या कुठलीही चर्चा सुरू नसल्याचं महाडमध्ये गुरुवारी झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या आजच्या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं आहे.
नुकतंच, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना यांची युती होणारच, असा विश्वास व्यक्त करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 'सामना'तून फटकारण्यात आलं होतं. फडणवीस सरकारला पाचव्या वर्षीत आगामी धोक्याची चाहूल लागली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे यांना शिवसेनाप्रेमाचा पान्हा फुटल्याचा टोला शिवसेनेने लगावलाय.