उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं, मुंबईत झळकले पोस्टर

शिवसेनेच्या गोटात वेगवान हालचाली

Updated: Nov 10, 2019, 10:39 AM IST
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं, मुंबईत झळकले पोस्टर title=

मुंबई : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं अशी शिवसैनिकांची इच्छा आहे, असे फलक आता मुंबईत झळकले आहेत. कलानगर, बांद्रा या भागात हे फलक लागले आहेत. बदललेल्या समीकरणामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची संधी असल्याची शिवसैनिकांची भावना आहे. शिवसेनेच्या गोटात वेगवान हालचाली घडत आहेत. शिवसेना आमदारांची दुपारी १२.३० वाजता महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. दुपारी द रिट्रीट हॉटेलवर आदित्य ठाकरे सर्व आमदारांची बैठक घेणार आहेत. दुपारी या बैठकीला उद्धव ठाकरेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 

काल मध्यरात्रीपासून आदित्य ठाकरे द रिट्रीट रिसॉर्टवर मुक्कामाला आहेत. मध्यरात्री आदित्य ठाकरेंनी शिवसेनेच्या महत्त्वाच्या आमदारांशी संवाद साधला. सामनातून संजय राऊत यांनी भाजपवर पुन्हा जोरदार टीका केली आहे. भाजपचा मुख्यमंत्री पुन्हा नको ही सर्वांचीच भूमिका असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे. त्यांनी भाजपचा उल्लेख हिटलर असा केला आहे. 

महाराष्ट्राच्या राजकारणात अजूनही सत्तास्थापनेचा तिढा कायम आहे. शिवसेना-भाजपमधील दरी वाढली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अजूनही काहीही स्पष्ट झालेलं नाही. 

सत्तास्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी काल राज्यपालांनी सर्वात मोठ्या पक्षाला म्हणजे भाजपाला सत्तास्थापनेसाठी विचारणा केली आहे. आज भाजपची महत्त्वाची बैठक सकाळी ११ वाजता होणार आहे. या बैठकीत या विचारणेबाबत चर्चा होईल आणि त्यानुसार प्रतिसाद दिला जाईल. 

काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना जयपूरला पाठवलं आहे. राजस्थानाता काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला स्वतः मुख्यमंत्री अशोक गेहलोत उपस्थित होते. तर भाजपने सरकार स्थापन केल्यास राष्ट्रवादी विरोधात मतदान करेल असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.