कोरोनामुळे मुंबईत दोन टप्प्यात होणार शैक्षणिक वर्षाची सुरूवात

१५ जूनपर्यंत शालेय पुस्तके सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवली जाणार

Updated: May 28, 2020, 04:27 PM IST
कोरोनामुळे मुंबईत दोन टप्प्यात होणार शैक्षणिक वर्षाची सुरूवात title=

मुंबई : कोरोनाच्या काळात मुंबईत दोन टप्प्यात शैक्षणिक वर्षाची सुरूवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात डिजिटल आणि दुस-या टप्प्यात फिजिकल असं या शैक्षणिक वर्षाचं स्वरुप असणार आहे. १५ जूनपासून ऑनलाईन लर्निंग फॉर्म होम संकल्पना सुरू होणार आहे. कोरोनाचा धोका कायम असल्यानं मुंबईत १५ जूनपासून एकही शाळा प्रत्यक्षात सुरू होणार नसल्यानं ऑनलाईन शिकवणीवर भर दिला जाणार आहे.

कोरोनाचा धोका कमी झाल्यानंतर शिफ्टमध्ये शाळा सुरू केली जाणार आहे. यात एका बेंचवर एकच विद्यार्थी बसेल असे नियोजन करून वर्ग भरवले जाणार आहेत. पालिकेच्या शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्याच्या कामास सुरूवात झाली आहे.

विद्यार्थ्याच्या घरी अँड्रॉईड मोबाईल आहे का ? तो मुंबईबाहेर आहे की मुंबईत ? १५ जून तसंच १ जुलैपर्यंत येवू शकणा-या विद्यार्थ्यांची संख्या किती ? अशी माहिती गोळा केली जात आहे.

१५ जूनपर्यंत शालेय पुस्तके सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवली जाणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकार निर्मित दिक्षा ( Diksha) या मोबाईल ऍपद्वारे ई-लर्निंग प्लॅटफॉर्म सुरू करण्यात येणार आहे.

मुंबईतील अडिच लाख विद्यार्थ्यांनी दिक्षा मोबाईल ऍप डाऊनलोड केला असून अडिच लाख विद्यार्थ्यांपर्यंत अभ्यासक्रमाची सॉफ्ट कॉपी पोहचवण्यात आली आहे. तसंच गूगल क्लास, झूमद्वारेही शिक्षक विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना शैक्षणिक मार्गदर्शन केलं जाणार आहे.