तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ क्लिपमुळे राजकारण तापलं, देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात एखाद्या महिला अधिकार्‍याची इतकी अवहेलना होऊ नये, हीच विनंती असं फडणवीस यांनी म्हटलं आहे

Updated: Aug 20, 2021, 07:13 PM IST
तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ क्लिपमुळे राजकारण तापलं, देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र title=

मुंबई : अहमदनगरच्या महिला तहसीलदार ज्योती देवरे (Jyoti Devre) यांनी आत्महत्येचा इशारा दिला आहे. वरिष्ठ आणि लोकप्रतिनिधींच्या त्रासाला वैतागलेल्याचा दावा करत तहसीलदाराने आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भातील एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. या घटनेमुळे नगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. 

या प्रकरणावरुन आता राजकारण तापलं आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांना पत्र लिहिलं असून प्रकरणाची तातडीने दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि त्यांचे म्हणणे प्रत्यक्ष ऐकून घेत त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचं पत्र

नगर जिल्ह्यातील पारनेरच्या तहसिलदार ज्योतीताई देवरे यांनी 11 मिनिटांची एक ऑडिओ क्लिप जारी करुन अनेक गंभीर आरोप केले आहेत. लसीकरणावरुन काही कर्मचाऱ्यांना पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर मारहाण करणं, अश्लील शिविगाळ करणं, महिला कर्मचाऱ्यांना मारण्यासाठी महिला पोलिसांना बोलवण्यास सांगणं, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांपर्यंत प्रकरण नेल्यानंतर तहसिलदार ज्योती देवरे यांच्याच बदनामीचा प्रयत्न करणं, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही त्यांना धमक्या प्राप्त होणं, यातून महिला अधिकाऱ्यांचं खच्चीकरण करणं, असे अनेक गंभीर आरोप त्यांनी केले आहेत. 

“थेट दीपाली चव्हाण प्रकरणाचा उल्लेख करून मी सुद्धा तुझ्याकडे येतेय, हा त्यांचा ऑडिओमधील आवाज अंगावर शहारे आणणारा आहे. एक स्त्री अधिकारी आपले कर्तव्य पार पाडत असताना संपूर्ण यंत्रणाच तिचे मानसिक खच्चीकरण करीत असेल आणि परिणामी त्या महिला अधिकार्‍याला आत्महत्येचा इशारा द्यावा लागत असेल तर ही बाब अतिशय गंभीर आणि मनाला वेदना देणारी आहे. खरे तर करोना काळात संपूर्ण यंत्रणा दबावात काम करीत असताना त्यांना आणखी नाहक त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाणे अतिशय आवश्यक आहे. माझी आपल्याला विनंती आहे की, आपण यात तत्काळ लक्ष घालून हस्तक्षेप करावा. या महिला अधिकार्‍याला आपण स्वत: बोलावून घेऊन त्यांची तक्रार ऐकून घ्यावी आणि त्यांच्या व्यथा समजून घ्याव्यात आणि तत्काळ त्यावर तोडगा काढून त्या अधिकार्‍याला न्याय द्यावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात एखाद्या महिला अधिकार्‍याची इतकी अवहेलना होऊ नये, हीच कळकळीची विनंती.”, असंही देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रात म्हटले आहे.