Thane Accident : मंगळवारी पहाटे उड्डाणपुलावरून खाली कोसळल्याने दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ठाण्यात (Thane News) घडली आहे. या अपघातात तरुणांचा जागीच मृत्यू झालाय. या भीषण अपघातामुळे (Thane Accident) एकच खळबळ उडाली आहे. दुचाकीवरुन भरधाव वेगाने येणाऱ्या या तरुणांची पुलावरील संरक्षक कठड्याला धडक बसली आणि ते थेट खाली कोसळले. या अपघातात त्यांचा मृत्यू झालाय. पोलिसांनी तात्काळ धाव घेत दोघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.
भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटले अन्...
ठाण्यातील कॅसलमिल नाका येथील उड्डाणपुलावर दुचाकीने प्रवास करत असताना चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. संरक्षण कठड्याला दुचाकीने धडक दिल्यानंतर हे दोघे तरुण खाली कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास ठाण्यातील माजिवडा येथून ठाणे स्टेशनच्या दिशेने जाणाऱ्या उड्डाणपुलावरून प्रतीक मोरे (21) आणि राजेश गुप्ता (26) हे दोघे दुचाकीवरुन प्रवास करत होते. मात्र भरधाव दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने त्यांचा अपघात झाला आणि ते थेट पुलाखाली कोसळले.
डॉक्टरांनी मृत घोषित केले
प्रतीक मोरे हा ठाण्यातील रहिवाशी असून त्याचा साथीदार राजेश हा उल्हासनगरचा रहिवाशी होता. या घटनेची माहिती मिळताच राबोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दुचाकीवरील ताबा सुटून दुचाकी उड्डाणपुलाच्या संरक्षक कठड्याला धडकली. त्यानंतर प्रतीक आणि राजेश थेट उड्डाणपुलावरुन खाली पडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. अपघातानंतर दोघांनाही रुग्णवाहकेतून प्राथमिक उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून दोघांना मयत घोषित केले.
दरम्यान, या प्रकरणी राबोडी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. हे दोघे तरुण डिलिव्हरी बॉय असल्याचे समोर आले असून या प्रकरणाचा पुढील तपास राबोडी पोलीस करत आहे.