कोकणात जाणाऱ्या दहा रेल्वे गाड्यांचे डब्बे वाढवणार

 कोकण रेल्वेवर गणेशोत्सवासाठी धावणाऱ्या दहा रेल्वे गाड्यांचे डब्बे वाढविले जाणार आहेत. 

Updated: Aug 22, 2019, 09:07 PM IST
कोकणात जाणाऱ्या दहा रेल्वे गाड्यांचे डब्बे वाढवणार title=

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी पाहता मध्य आणि कोकण रेल्वेकडून आणखी 6 विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल, पुणे आणि सावंतवाडी रोड या स्थानकांसाठी विशेष ट्रेन चालविण्यात येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेवर गणेशोत्सवासाठी धावणाऱ्या दहा रेल्वे गाड्यांचे डब्बे वाढविले जाणार आहेत. यामध्ये जनरल डब्यांप्रमाणे थ्री टायर डब्यांचा समावेश आहे. 

कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवात धावणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्यानं रेल्वे प्रशासनानं हा निर्णय़ घेतलाय. मध्य रेल्वे प्रमाणं पश्चिम रेल्वेनं तीन गाड्यांचे गाड्यांचे डब्बे वाढवले आहेत. वाढवलेल्या डब्यांमुळे प्रतिक्षा यादीत गेलेल्या अनेक मुंबईकरांना कन्फर्म तिकीटं मिळतील. शिवाय सर्वसाधारण डब्यांमुळे जास्तीत जास्त मुंबईकरांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाता येणार आहे.

तुतारीच्या वेळेत बदल 

प्रवाशांची गर्दी पाहता मध्य रेल्वेकडून २२ ऑगस्ट ते १० सप्टेंबरपर्यंत तुतारी एक्स्प्रेस दादर स्थानकातील फलाट क्रमांक ५ वरून रात्री १२.१० वाजता सुटणार आहे. ती सावंतवाडी रोडला दुपारी १२.२५  वाजता पोहोचेल. तर परतीच्या प्रवासावेळी तुतारी एक्स्प्रेस सायंकाळी ६.३० वाजता दादर स्थानकातील फलाट क्रमांक ५ वर दाखल होईल.