दिवाळीच्या तोंडावर बाजारपेठा फुलल्या, महागाईने जनता त्रस्त

दिवाळीच्या सणाला काही तासच बाकी असल्यामुळे शहरांसह राज्यातील विविध बाजारपेठा फुलल्या आहेत. नागरिकांनीही खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली आहे. मात्र, वाढत्या महागायीचा खिशावर पडणारा बोजा विचारात घेऊन ग्राहक हात आकडता घेत असल्याचे चित्र आहे.

Updated: Oct 15, 2017, 11:08 AM IST
दिवाळीच्या तोंडावर बाजारपेठा फुलल्या, महागाईने जनता त्रस्त title=

मुंबई : दिवाळीच्या सणाला काही तासच बाकी असल्यामुळे शहरांसह राज्यातील विविध बाजारपेठा फुलल्या आहेत. नागरिकांनीही खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली आहे. मात्र, वाढत्या महागायीचा खिशावर पडणारा बोजा विचारात घेऊन ग्राहक हात आकडता घेत असल्याचे चित्र आहे.

लहानांपासून थोरांपर्यंत लागणाऱ्या सर्व वस्तूंची बाजारात रेलचेल आहे. तर, किराणा माल, मिठाई, कपडे बाजारपेठ आदी दुकानांमध्येही मोठी गर्दी पहायला मिळत आहे. मुंबईत नवीन कपडे, रांगोळी, पणत्या, कंदील, फराळ बनवण्यासाठीचं साहित्य याची जोरदार खरेदी सुरु आहे. विशेष म्हणजे शनिवारी सांयकाळी पावसानं हजेरी लावल्यानंतरही दादरमध्ये खरेदीच्या उत्साहात अजिबात कमतरता दिसून आली नाही. तर पुणेकरांसाठी शनिवार हा दिवस खरेदीची पर्वणी असाच ठरला.

दिवसभर पावसाची रिमझिम सुरु असतानाही पुणेकरांनी दिवाळी खरेदीसाठी मोठी गर्दी केली. त्यामुळे मुख्य रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्या पार्श्वभूमिवर पोलिसांनी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला होता. खास करून लक्ष्मी रस्त्यावरची परिस्थिती नियंत्रणात होती. त्यामुळे नाहकच्या त्रासातून नागरिकांची मुक्तता झाल्याचं चित्र होतं. दरम्यान आज रविवारची सुट्टी असल्याने बाजारपेठांमध्ये दिवाळी खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडण्य़ाची शक्यता आहे.

दरम्यान, नोटबंदी, जीएसटी या सरकारी निर्णयाचा जनतेला चांगलाच फटका बसल्याने त्याचा परिणाम विक्रीवर होत असल्याची प्रतिक्रीया दुकानदार आणि व्यावसायीक व्यक्त करताना दिसत आहेत. ग्राहकांकडेही आर्थिक तंगी असल्याने दिवाळीच्या आनंदावर आर्थिक मंदी आल्याचे चित्र बाजारपेठेत पहायला मिळत आहे.