मुंबई : एका झटक्यात सहा नगरसेवकांचे पक्ष सोडून जाणे हे मनसेच्या फारच जिव्हारी लागले आहे. त्यामुळे नगरसेवक फोडण्याच्या पार्श्वभूमीवर मनसे-शिवसेनेत संघर्षाला सुरुवात झाली असून, संतपलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनासमोर होर्डिंग लावले आहे. या होर्डिंगवर‘मागितले असते तर सात दिले असते, चोरुन फक्त छक्के घेऊन गेले’, असा मजकूर आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या होर्डिंगचा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट केला आहे. नगरसेवकांच्या पक्षांतराने मनसेच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. खुद्द पक्षनेतृत्वालाही या प्रकारामुळे धक्का बसला आहे. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष असल्याचे पहायला मिळत आहे. या आधी काही कार्यकर्त्यांनी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान कृष्णकुंजवर हजेरी लाऊन जोरदार घोषणाबाजी केली. या कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.
दिलीप लांडे, दत्ताराम नरवणकर, परमेश्वर कदम, डॉ.अर्चना भालेराव, अश्विनी माटेकर आणि हर्षला मोरे अशी मनसे सोडून शिवसेनेत आलेल्या नगरसेवकांची नावे आहेत. दरम्यान, नगरसेवकांच्या पक्षांतराचा त्रास त्यांच्या कुटुंबियांना होऊ नये यासाठी या सहाही नगरसेवकांच्या घराला आणि कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेतील मनसेची ताकद संपुष्टात आणून सहा नगरसेवक शिवसेनेने आपल्याकडे घेतल्याने मनसेला मोठा धक्का बसला आहे.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) October 15, 2017
गेल्या काही वर्षात मनसेची प्रचंड प्रमाणात पडझड सुरू आहे. त्यातच गेल्या महानगरपालिका निवडणुकीत कसेबसे ७ नगरसेवक पक्षाच्या हाती लागले होते. त्यामुळे पक्षातील मरगळ कशी झटकायची या विचारात नेतृत्व होतेच. त्यातून पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी रेल्वे प्रशासनाविरोधात मोर्चा काढत तसेच, फेसबुक पेजवरून केलेली ग्रॅण्ड एण्ट्री केली. नोटबंदी, जीएसटी आदी मुद्द्यांवरूनही त्यांनी थेट मोदींवर निशाणा साधत वातावरण तापविण्यास सुरूवात केली. यातून मनसेला सूर सापडत आहे, असे चित्र निर्माण होऊ लागले होते. तेवड्यात शिवसेनेने बाण मारला आणि अवघा मनसेच गारद झाला.