कोणता झेंडा घेऊ हाती! शिवसेना-शिंदे गटात आता मंडळांसाठी रस्सीखेच

आता मिशन मुंबईतील मंडळं, दहीहंडी आणि गणेशोत्सव मंडळांवर ऑफर्सची बरसात 

Updated: Jul 21, 2022, 07:09 PM IST
कोणता झेंडा घेऊ हाती! शिवसेना-शिंदे गटात आता मंडळांसाठी रस्सीखेच title=

रुचा वझे, झी मीडिया, मुंबई : शिवसेनेतल्या ठाकरे-शिंदे गटातला संघर्ष आता मुंबईतल्या गणेशोत्सव मंडळांपर्यंत पोहचलाय. मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरात या मंडळावर गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचंच वर्चस्व आहे. मात्र आता या मंडळांमध्येही उभी फूट पडण्याची शक्यता आहे. 

काही मंडळं अजूनही ठाकरेंचेच कट्टर समर्थक आहेत. तर काही  नव्या वाटेनं जाण्याच्या विचारात आहेत. प्रॅक्टीस, टी-शर्ट, गोविंदांचं जेवण, प्रवासाच्या खर्चासाठी मंडळं राजकीय पक्षांचे उंबरे झिझवतात. मात्र यंदा या मंडळांना बंपर ऑफर्स येतायत. त्यात महापालिका निवडणूक तोंडावर असल्य़ामुळे राजकीय संघर्षात मंडळांची चांगलीच चंगळ आहे. 

लालबाग, परळ आणि दक्षिण मुंबईतल्या अनेक मोठ्या मंडळांची शिवसेनेवर निष्ठा आहे. मात्र पूर्व आणि पश्चिम उपनगरांतल्या अनेक मंडळांमध्ये कोणत्या गटात सहभागी व्हावं याबाबत संभ्रम आहे. मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी दहीहंडीतूनच ओळख निर्माण केलीय. माझगावमध्ये यशवंत जाधवांचा शब्द मंडळांसाठी प्रमाण.

कुर्ला मतदार संघात मंडळांवर आमदार मंगेश कुडाळकरांचं वर्चस्व आहे. हे सर्व आमदार शिंदे गटात आहेत. त्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरूय. कोरोना काळात गणेशोत्सव मंडळांचं योगदान मोलाचं होतं. त्याची दखल थेट राजभवनानं घेतली. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वेळ दिली नसल्यानं काही मंडळांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळे आता ही मंडळं ठाकरे निष्ठेला प्राधान्य देणार की बंपर ऑफर्स स्वीकारणार याची उत्सुकता मुंबईकरांना लागलीय.