राज्यकर्त्यांच्या डोक्यात मस्तवालपणा चढलाय - उद्धव ठाकरे

 शिवसेनेच्या आज झालेल्या कार्यकारिणी बैठकीत यापुढे प्रत्येक राज्यात शिवसेना स्वबळावर निवडणुका लढणार असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलीय. या बैठकीत उद्धव ठाकरेंची 'पक्षप्रमुख' म्हणून फेरनियुक्ती करण्याचा सोपस्कार पार पाडला गेला. 

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 23, 2018, 01:49 PM IST
राज्यकर्त्यांच्या डोक्यात मस्तवालपणा चढलाय - उद्धव ठाकरे  title=

मुंबई : शिवसेना कार्यकारिणीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंची 'पक्षप्रमुख' म्हणून फेरनियुक्ती झाल्यानंतर त्यांनी भाजपचा पुन्हा एकदा समाचार घेतला.

सत्ताधाऱ्यांमध्ये मस्तवालपणा वाढला असून केंद्रीय मंत्री गडकरींनी जवानांचा अपमान करणं हा त्याचाच भाग असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केलीय.

सरदार पटेल आज असते तर काश्मीरचा प्रश्न सुटला असता असं सांगत त्यांनी पंतप्रधान मोदींनाही लक्ष्य केलं. 

महाराष्ट्रात स्वबळावरच लढणार, हे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय. इथून पुढच्या सगळ्या निवडणुका शिवसेना स्वबळावरच लढणार, याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केलीय. मुंबईत शिवसेनेच्या झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्वबळाचा नारा दिला, तशा पद्धतीचा ठरावही या बैठकीत करण्यात आला.   

काय काय म्हणाले उद्धव ठाकरे...

- बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम करतोय... तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही 

- नौदल अधिकाऱ्यांना 'बॉर्डरवर जा... दक्षिण मुंबईत जमीन देणार नाही' म्हणणाऱ्या नितीन गडकरींवर उद्धव ठाकरेंची टीका... 

- नितीन गडकरींनी सैनिकांची अवहेलना केली...चार चौघांत नौदलाचा अपमान करणं अयोग्य 

- राज्यकर्त्यांच्या डोक्यात मस्तवालपणा चढलाय... भाजप, राज्य सरकारवर उद्धव ठाकरेंची जोरदार टीका

- गायीला मारणं पाप मग, थापा मारणं हे पाप नाही? गोहत्या बंदी करता तसं थापाबंदीही करा... लोकांना फसवून सत्ता मिळवणं हेही पापच...

- हिंदूत्वाच्या भाकड कल्पना आम्हाला मान्य नाही... 

- कोरेगाव-भीमा दंगलीमागे अदृश्य हात... मराठी माणसात फूट पाडून राजकारण नको... 

- चंद्रकांत पाटलांच्या कन्नड प्रेमावर टीका... पाटील कर्नाटकात जाऊन नाटक करा... 

- जगायचं असेल तर वाघ म्हणून जगा भेकड म्हणून जगू नका

- कालचा गोंधळ बरा होता असं म्हणण्याची वेळ आली असेल तर तुमचं सरकार आणि त्यांचं सरकार यात फरक काय?

- शेतकऱ्याला विचारा कर्जबाजी मिळाली का?... महिलांना विचारा योजनांचा लाभ मिळाला का?

- सरकारी नोकरांना सातवा वेतना आयोग कधी?

- जाहीरातबाजी करणारं सरकार खाली खेचावच लागेल

- एक बुथ दहा युथ... जनतेतंल ट्रूथ शोधा 

- स्वत:च्या हिंमतीवर महाराष्ट्र काबीज करा