Uddhav Thackeray : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतील काळाचौकीत जंगी स्वागत करण्यात आलं. अभ्युदयनगर येथील नुतनीकरण केलेल्या शिवसेना शाखेचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येनं शिवसैनिक जमा झाले होते. यावेळी सुभाष देसाई, रश्मी ठाकरे, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर देखील उपस्थित होते.
उद्याच्या महाराष्ट्राचे मंगल उद्धव ठाकरेंच्याच हस्ते होणार आहे असे खासदार अरविंद सावंत म्हणाले. तर उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला
"गेले बरेच दिवस अरविंद सावंत माझ्या मागे लागले होते. पण मी दुर्लक्ष करत होतो. हल्ली आमदार खासदार बोलतील ते ऐकावेच लागते असे दिवस आहेत. याचं कारण नक्की कोण कोणाबरोबर आहे हे कळतचं नाही. तुम्ही माझ्या सोबत आहात हे मला माहिती आहे. कितीही वादळं आली तरी शिवसेनेची मुळं घट्ट आहेत आणि ती कोणीही हलवू शकत नाही. जे गेले आहेत त्यांनी विनंती केली आहे की आम्हाला गद्दार बोलू नका. पण आम्ही बोलत नाहीत तुम्ही तुमच्या कपाळावर शिक्का मारुन घेतलाय तो बोलतोय," असे उद्धव ठाकरे म्हणाले.
"आता हळुहळु चित्र स्पष्ट होत आहे. जे गेले आहेत त्यांच्यासोबत एकही शिवसैनिक गेलेला नाही. त्यांना वाटलं होते जिथे सत्ता येते तिथे शिवसैनिक येतो. पण जिथे शिवसैनिक असतो तिथे सत्ता येते. जे गेले आहेत ते एवढ्या गर्दीत मिसळून दाखवू शकतील का?" असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
"2019 साली जेव्हा भाजपसोबत सगळे करार ठरले होते त्यानंतर लोकसभा निवडणूक झाली. ती निवडणूक जिंकल्यानंतर आपल्याला एक मंत्रीपद मिळाले. ते मंत्रीपद आपल्याला नो होते तेच आपल्या गळ्यात मारलं. त्यानंतर पाच सहा महिन्यानंतर जे ठरलं होते ते केलं नाही. आता ते सांगत आहेत की शिवसेनेचा मुख्यमंत्री केले. पण मी अडीच वर्षापूर्वी मी हेच बोंबलून सांगत होतो तेव्हा केले असते तर सन्मानाने झालं असतं. मनावर दगड ठेवून आज ते करायला लागलं आहे. तेव्हाच झाले असते तर पाच वर्षात भाजपाच्या कोणत्यातरी अडीच वर्षांसाठी शेंदूर लागला असता," असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
"आधी अडीच वर्षे शिवसेनेचा आणि नंतर भाजपचा मुख्यमंत्री असे ठरले होते. पण नंतर जागा कमी देऊन बंडखोरी करत जागा पाडल्या. त्याच्यानंतर कहर करत असे काही ठरलेच नाही असे सांगितले. तेव्हा शक्य नव्हतं तर आता कसं शक्य झालं," असे उद्धव ठाकरे म्हणाले.
"आता आपल्याला सामान्यातून असामान्य लोकं घडवायची आहेत. ही माणसे सामान्य आहेत पण त्यांची ताकद असामान्य आहे. त्यांना अजून कळलेले नाही की त्यांनी कोणाशी पंगा घेतलेला आहे. ५६ वर्षापूर्वी शिवसेना स्थापन झाली तेव्हा आपल्या मनगटांमध्ये ताकद आहे याची जाणीव बाळासाहेबांनी करुन दिली नसती तर आपली मनगटे पिचून गेली असती. ज्या सगळ्या दगडांना शिवसेनेने शेंदूर फासला होता ते आता शिवसेना संपवायला निघालेले आहेत. त्यांचे जे कर्तेकरविते आहेत त्यांना शिवसेना संपवायची आहे. त्यांना मुंबईवरचा आपला ठसा पुसून टाकायचा आहे आणि त्यांचा ठसा उमटवायचा आहे," असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
"अनेकदा शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला पण आजचा प्रयत्न शिवसेना संपवण्याचा आहे हे लक्षात घ्या. कायदे तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार आता फुटलेल्या आमदारांना कोणत्या ना कोणत्या पक्षात जाण्याशिवाय पर्याय नाही. काल एका पक्षाने त्यांना ऑफर दिली आहे. त्यांना एकतर शिवसेना संपवायची आहे आणि शिवसेना आणि ठाकरे हे नाते तोडायचे आहे. नातं तोडायचे असेल तर बाळासाहेबांचा फोटो लावू नका. हिंमत असेल तर स्वतःच्या नावाने मतं मागा. जे फुटून गेले आहेत त्यांनी आई वडीलांना सोबत घेऊन सभा घ्याव्यात आणि मतं मागावी. तुम्हाला पक्षही चोरायचा आहे आणि वडीलही. तुम्ही दरोडेखोर आहात. अशा लोकांच्या हातात तुम्ही मुंबई, महाराष्ट्र आणि तुमचं आयुष्य देणार आहात का? ," असाही सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
"कोर्टात केस सुरु असल्याने मी त्याविषयी जास्त बोलणार नाही. आता त्यांनी निवडणूक आयोगाकडे सांगितले आहे की आमचीच खरी शिवसेना असल्याचे सांगितले आहे. मग हे कोण आहेत? या कारस्थानांना नुस्त्या जल्लोषाने उत्तर देऊन चालणार नाही. मला प्रत्येकाचे शपथपत्र हवे आहे," असे उद्धव ठाकरे म्हणाले.
"तुम्ही कितीही पैसा ओतला तरी त्याला चौपटीने माझं हे वैभव पुरून उरल्याशिवाय राहणार नाही. लवकरच गणपती बाप्पा येत आहे. मी गणपतीला साकडं घालत आहे की, तुझ्या आगमनाच्या आधी हे संकट पूर्ण तोडून शिवसेनेचा भगवा महाराष्ट्रासह हिंदुस्तानावर फडकू दे. कारण खरा भगवा कोणता आहे हे दाखवून देण्याची गरज आहे. त्यांना कळत नाहीये की चाल फक्त शिवसेना संपवण्याची नसून मराठी माणसाला संपवण्याची आणि हिंदूंमध्ये फूट पाडण्याची आहे. आजपर्यंत अनेक जण विचारात होते तुमच्या आणि भाजपच्या हिंदुत्वामध्ये फरक काय? शिवसेना ही हिंदुत्वासाठी राजकारण करते आणि भाजप राजकारणासाठी हिंदुत्व वापरते," असेही उद्धव ठाकरे म्हणाले.