Maharashtra Politics : सध्याच्या विपरित घडामोडींच्या काळात तुम्ही शिवसेनेची (Shivsena) असलेली आपली निष्ठा अभेद्य ठेवली, तुमच्यामुळे शिवसेनेला बळ मिळालं, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजापूरचे शिवसेना आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांना पत्र लिहिलं आहे.
उद्धव ठाकरेंनी राजापूरचे आमदार राजन साळवींना लिहिलेल्या पत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) जोरदार टीका केलीय. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पाठिराख्यांचे शिवसेना बळकावण्याचे मनसुबे धुळीस मिळवणार असल्याचा निर्धार या पत्रात त्यांनी व्यक्त केलाय. आमदार राजन साळवी यांनी हे पत्र आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केलं आहे.
उद्धव ठाकरेंनी पत्रात काय लिहिलंय?
सध्याच्या विपरित घडामोडींच्या काळात तुम्ही शिवसेनेची असलेली आपली निष्ठा अभेद्य ठेवली. याबद्दल सर्वप्रथम शिवसेनेचा पक्षप्रमुख म्हणून मी व्यक्तिशः व शिवसेना पक्षाच्या वतीने तुम्हाला धन्यवाद देतो. विशेषतः 4 जुलै रोजी फुटीर शिंदे गटाच्या सरकारने मांडलेल्या विश्वासदर्शक प्रस्तावाला अनेक आमिषे व दबाव तंत्राचा वापर झाला असतानाही शिवसेना पक्षाने दिलेल्या आदेशाप्रमाणे तुम्ही ठाम विरोध केला.
घटनेच्या दहाव्या परिशिष्टाच्या परिच्छेद 2 (1) (बी) खाली अपात्र होण्याची भीती दाखविली जात असताना शिवसेना पक्षाचे निर्देश झुगारुन देण्याचे फुटीरांचे डावपेच आपण जुमानले नाही याचा मला व तमाम शिवसैनिकांना सार्थ अभिमान वाटतो.
शिवसेनेच्या ध्येय धोरणांवरील अढळ श्रद्धेपायी तुम्ही एकनाथ शिंदेच्या फाटाफुटीच्या डावपेचांना पुरुन उरलात व त्यांनी बनविलेल्या बेकायदेशीर सरकारला भीक घातली नाही किंवा अपात्र होण्याची भीती बाळगली नाही.
एकनाथ शिंदे व त्यांच्या पाठिराख्यांचे शिवसेना बळकविण्याचे मनसुबे तुमच्यासारख्या निष्ठावंत शिवसैनिकांच्या पाठबळावर मी धुळीस मिळविणारच हे अभिवचन आज आपल्याला देत आहे. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेबांनी स्थापन केलेली ही बलाढ्य शिवसेना आपण सर्वजण मिळून पुढील काळात अधिक उंचीवर नेऊ असा विश्वास व्यक्त करुया.