'मोदींचं ध्यान आचारसंहितेचं उल्लंघन, निवडणूक आयोग BJP ची शाखा'; राऊतांचा शाहांवरही गंभीर आरोप

Sanjay Raut On Election Commission: संजय राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगच्या कारभारावर टीका करताना राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांनाही लक्ष्य केलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 3, 2024, 11:08 AM IST
'मोदींचं ध्यान आचारसंहितेचं उल्लंघन, निवडणूक आयोग BJP ची शाखा'; राऊतांचा शाहांवरही गंभीर आरोप title=
राऊत यांनी साधला निवडणूक आयोगावर निशाणा

Sanjay Raut On Election Commission: उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेवटच्या टप्प्याच्या मतदानाच्या दिवशी केलेली ध्यानधारणा हा आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. तसेच देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देशभरातील वेगवगेळ्या भागातील जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन सूचना दिल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे.

मोदींनी ध्यान करणं आचारसंहितेचं उल्लंघन

निवडणूक आयोगावर निशाणा साधताना संजय राऊत यांनी, "निवडणूक आयोगाबद्दल लोकांच्या मनात फार शंका आहेत. ही तटस्थपणे वागणारी एक संवैधानिक संस्था आहे. मात्र ज्या पद्धतीने वारंवार आम्हा विरोधकांना निवडणूक आयोगासमोर हात जोडावे लागतात. काही गोष्टी समोर मांडाव्या लागतात. त्यावरही निवडणूक आयोग ऐकून न ऐकल्यासारखं करतं. हे स्वतंत्र्य संस्थेचं लक्षण नाही," असा टोला लगावला आहे. तसेच पुढे बोलताना राऊत यांनी, "पंतप्रधान मतदानाच्या दिवशी ध्यान धारणेला बसतात आणि वृत्तवाहिन्यांचं पूर्ण लक्ष त्यांच्यावर असतं. हे निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचं उल्लंघन आहे," असंही म्हटलं.

निवडणूक आयोग भाजपाची एक शाखा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. "देशाचे गृहमंत्री देशाच्या वेगवेगळ्या भागातील जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन सूचना देतात, हे आचारसंहितेच्या नियमांचं उल्लंघन आहे. पोलिंग एजंट्सला ज्या पद्धतीने रोखण्यात आलं ते सुद्धा चुकीचं आहे. असं आधी कधी झालं नव्हतं. लोकांवर मानसिक दबाव आणणेही आचारसंहितेचा भंग आहे. उद्या मतमोजणी सुरु होईल तेव्हा काय होईल मला ठाऊक नाही. या देशात निवडणूक आयोगाला सांगावं लागतं की तुम्ही स्वतंत्र संस्था आहात. तुम्ही समजून घ्या की तुम्ही कोणाचे गुलाम नाही आहात. मग तो भाजपा असो किंवा इतर कोणता सत्ताधारी पक्ष असो, तुम्ही स्वतंत्र्यपणे काम करा. पण सध्या निवडणूक आयोग भाजपाची एक शाखा म्हणून काम करत आहे. म्हणून या देशातील लोकशाही मागील 10 वर्षांमध्ये संकटात आली आहे," असं राऊत म्हणाले.

भारतावर जगाचं लक्ष कारण...

ध्यानधारणेनंतर मोदींनी एक पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये त्यांनी संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे आहे असं म्हटलं आहे, असा उल्लेख करत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राऊत यांनी, "केवळ कॅमेराचं लक्ष मोदींकडे होते. संपूर्ण जगाचं लक्ष नाहीये. या देशातील लोकशाही वाचले का यासाठी जगाचं आपल्या देशाकडे लक्ष आहे. मोदीजी लोकशाही वाचू देतील का? मोदीजी योग्य पद्धतीने मतमोजणी होईल का? या प्रश्नांसाठी जगाचं लक्ष भारताकडे आहे," असा टोला राऊत लगावला.

पदवीधर मतदारसंघ, शिक्षक मतदारसंघाच्या सर्व जागा जिंकू

राज्यातील शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबद्दलही राऊत यांनी आपलं मत मांडलं. "शिक्षक मतदारसंघ, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका आहेत. मुंबईतील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ शिवसेना लढवत आहे. पदवीधर मतदारसंघासाठी अनिल परब उमेदवारी अर्ज दाखल करतील. नाशिक पदवीधर मतदारसंघही शिवसेना लढवणार असून तिथे संदीप गुळवे आमचे उमेदवार आहेत. कोकणामध्ये सुद्धा निवडणुका आहेत. आम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवल्या. आम्ही एकत्र आहोत. उत्तम नोंदणी आहेत. उत्तम चेहरे दिलेले आहेत. सगळ्या जागा आम्ही जिंकू," असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. 

पत्रकाराने राऊत यांना, नाशिकमध्ये तुम्ही मागच्या वेळेस खूप मेहनेत घेतली होती. मात्र ते आमदार आता आपल्या गटात नाही. आता यावेळेस चित्र कसं असेल? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी, "ठिक आहे ना, ते आमदारबरोबर नसले तरी मतदार आमच्याबरोबर आहेत. संदीप गुळवे हे मराठा शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक आहेत. राजकीय, सामाजिक, शिक्षण क्षेत्रात त्यांचे संपर्क आणि काम आहे. ते उत्तम उमेदवार असून ती जागा आमच्याकडे निवडून पुन्हा येईल," असं म्हटलं.