Uddhav Thackeray vs Raj Thackeray : शिवसनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी शिवसेनेच्या नवनिर्वाचित खासदारांचं स्वागत करण्यात आलं तर लोकसभा निकालानंतर उद्धव ठाकरेंची तोफ चांगलीच कडाडल्याचं पहायला मिळालं. उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना नेहमीप्रमाणे शिंदे गटावर आणि भाजपवर तोफ डागली. परंतू यावेळी उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला. आपले कोण आणि परके कोण? हे लोकसभा निकालातून कळालं, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मनातील खंत देखील बोलून दाखवली.
मला एका गोष्टीचा नक्कीच अभिमान आहे, की या निवडणुकीत फक्त शिवसेनाप्रमुखांचा फोटो वापरला. इतर कोणाचाही फोटो लावला नाही, याचा आम्हाला अभिमान आहे. या निवडणुकीत आपले कोण आणि परके कोण हे कळालं. काही जणांनी फक्त उद्धव ठाकरे नको म्हणून बिनशर्ट पाठिंबा दिला, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना जोरदार टोला लगावला. उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट... असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली. उद्धव ठाकरेंनी टीका केल्यानंतर सभेत टाळ्या आणि शिट्ट्या वाजल्या.
एनडीएच सरकार पडलं पाहिजे. आमच्यात आत्मविश्वास आहे. तर मोदींमध्ये अहंकार आहेत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेनाप्रमुखांनी दोन गोष्टी मला सांगितल्या, एक आहे आत्मविश्वास. माणसांमध्ये अहंकार असू नये. आत्मविश्वास असावा परंतु मोदींसारखा अहंकार असू नये, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. भुजबळ शिवसेनेत जाणार, या नुसत्या उचापत्या भाजपवाले करत आहे. मी त्यांच्याशी बोललो नाही, की ते माझ्याशी बोलले नाहीत, असा खुलासा देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.
दरम्यान, शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही बाजूंचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. वरळीमध्ये शिंदे गटाचा देखील मेळावा झाला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी देखील उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ठाकरे गट फक्त काँग्रेसच्या वोट बँकमुळे जिंकली, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.