भाजपवर दबाव आणण्यासाठीच उद्धव ठाकरेंनी राम मंदिराचा मुद्दा उचलला- संघ

जानेवारी महिन्यापर्यंत केंद्र सरकार राम मंदिरासंबंधी अध्यादेश काढेल असे वाटत नाही. 

Updated: Nov 24, 2018, 06:30 PM IST
भाजपवर दबाव आणण्यासाठीच उद्धव ठाकरेंनी राम मंदिराचा मुद्दा उचलला- संघ

मुंबई: आगामी निवडणुकांमध्ये भाजपवर युतीसाठी दबाव टाकण्याच्या उद्देशानेच शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा उचलून धरला आहे, अशी टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) ज्येष्ठ नेते मा.गो. वैद्य यांनी केली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मा.गो. वैद्य यांनी हे मत मांडले. यावेळी वैद्य यांनी म्हटले की, जानेवारी महिन्यापर्यंत केंद्र सरकार राम मंदिरासंबंधी अध्यादेश काढेल असे वाटत नाही. 

उद्धव ठाकरे भाजपला राम मंदिर उभारण्याच्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. याविषयी विचारले असता वैद्य यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर टीका केली. आगामी निवडणुकीत भाजपने आपल्याशी युती करावी म्हणूनच शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा उचलून धरल्याचे त्यांनी म्हटले. 

दरम्यान, अयोध्येत दाखल झालेल्या उद्धव यांनी राम मंदिर कधी बांधणार आहात, याची तारीख सांगून टाका, असा सवाल भाजपला विचारला. मी झोपलेल्या कुंभकर्णाला उठवायला मी अयोध्येत आलो आहे. मी राजकारण करण्यासाठी अयोध्येत आलो नााही. तर प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. राम मंदिरासाठी किती वर्ष वाट बघणार. अयोध्येत राम मंदिर व्हावं ही प्रत्येक हिंदूची इच्छा आहे. त्यामुळे राम मंदिर कधी बांधणार यासाठी एकदाची तारीख जाहीर करून टाका, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.