Uddhav Thackeray on NDA: महाविकास आघाडीची पत्रकार परिषद नुकतीच पार पडली. यावेळी शरद पवार,उद्धव ठाकरे,बाळासाहेब थोरात, जयंत पाटील,आदित्य ठाकरे,संजय राऊत,पृथ्वीराज चव्हाण,जितेंद्र आव्हाड,अनिल देसाई उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यामध्ये उद्धव ठाकरे बसले होते. अशावेळी तुम्ही एनडीएत जाणार का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी जे उत्तर दिले त्याने सर्वत्र हशा पिकला. मविआच्या पत्रकार परिषदेत काय घडलं? जाणून घेऊया.
राज्यातील जनतेचे आभार मानण्यासाठी आम्ही आलोय.लोकशाही वाचवण्यासाठी राज्याचा मोठा वाटा राहिला आहे. प्रचंड धनशक्तीविरोधात आम्हाला लढावे लागले. धार्मिक धृवीकरणाचा प्रयत्न झाला.जनतेच्या प्रश्नाला आम्ही प्राधान्य दिल्याचे यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आमची बैठक झाली. लोकसभेप्रमाणे मविआ ताकदीने लढणार आहे. राज्यात सत्तापरिवर्तन नक्की होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान मोदी यांच्या 18 सभा आणि एक रोड शो झाला. परंतु त्यांनी जिथं सभा घेतल्या..तिथं जागा पडल्या असे सांगत शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले.
त्यांच्या अंजिक्यपणा किती फोल आहे हे जनतेने दाखवून दिले. ही विषम लढाई होती..संविधान वाचविण्यासाठी लढाई होती. हा विजय अंतिम नाही. लढाई सुरु झालीय. मोदी सरकारचे एनडीए सरकार झाले. हे सरकार किती दिवस चालेल असा प्रश्न आहे. हे कडबोळ्यांचे सरकार कसे चालतंय बघूया, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. विधानसभेला आम्ही एकत्र सामोरे जावू. निर्णय कसा अयोग्य होता हे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते. जनतेच्या कोर्टात आम्ही जिंकलोय, असे ते म्हणाले. आम्हाला भाजपमुक्त राम हवा असे मी म्हणालो होतो, तसे घडत असल्याचे दिसतेय, असे ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या जागा आल्यात, त्यानंतर कॉंग्रेस नेते म्हणतात आम्ही मोठा भाऊ, यावर उद्धव ठाकरेंना प्रतिक्रिया विचारण्यात आला. यावर मोठा भाऊ-छोटा भाऊ कोणी नाही, असे पृथ्वीराज म्हणाले. यातून आमची एकवाक्यता दिसत असल्याचे ठाकरे म्हणाले.
दरम्यान उद्धव ठाकरे भविष्यात एनडीसोबत जातील, या रवी राणा यांच्या विधानावर उद्धव ठाकरेंना प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा रवी राणांचे नाव ऐकून त्यांनी सुरुवातीला चला जाऊदे म्हणत उत्तर देणे टाळले. पण उद्धव ठाकरे पुन्हा एनडीएसोबत येतील, असे नेरेटीव्ह तयार होत असल्याचे उद्धव ठाकरेंना सांगण्यात आले. 'मला समजा जायचंय. तर यांच्यात बसून आता हो सांगू? असा प्रतिप्रश्न त्यांनी पत्रकारांना विचारला.' यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.
तुम्हाला जी लोकं सोडून गेली त्यांना पुन्हा घेणार का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला. त्यावेळी अजिबात नाही, असे उत्तर त्यांनी दिले.