Raj Thackeray : मनसेच्या इंजिनला डबे नाहीच, राज ठाकरेंचा 'एकला चलो रे'चा नारा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मुंबई महापालिकेसाठी स्वबळाचा नारा दिलाय.    

Updated: Oct 11, 2022, 11:34 PM IST
Raj Thackeray : मनसेच्या इंजिनला डबे नाहीच, राज ठाकरेंचा 'एकला चलो रे'चा नारा title=

मुंबई : अवघ्या काही दिवसांवर मुंबई पालिकेची निवडणूक (Bmc Election 2022) आलीय. सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी दंड थोपाटलेत. त्यात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही आपली भूमिका स्पष्ट केलीय.  मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मुंबई महापालिकेसाठी स्वबळाचा नारा दिलाय. तसेच मनसैनिकांना तातडीनं कामाला लागण्याचे आदेश दिलेत. आता मनसेच्या स्वबळामुळे मुंबई महापालिकेतली गणितं कशी बदलतील, हे जाणून घेऊयात. (upcoming election would be fought on its own says mns chief raj thackeray to his party follwers)

शिवसेनेत पडलेली उभी फूट, भाजप-शिंदे युती आणि एकाकी उद्धव ठाकरे अशा सगळ्या बदललेल्या राजकीय समीकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिलाय. मुंबई महापालिकेसाठी कुणाशीही युती नाही, तयारीला लागा असे आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिलेत. 

राज काय म्हणाले?

"येणारी निवडणूक स्वबळावर लढायची.  तुमचं पॉझिटीव्ह माईंड असलं पाहिजे. राज्यातलं राजकारण खालच्या थराला जातंय. महापालिकेत न भूतो असं यश मिळवायचंय. मी तुम्हाला विधानसभेत सत्तेत बसवणार.  लोकसेभत सत्तेत खासदार म्हणून बसवणार.  लोकांच्या सुख दुःखामध्ये जा, तुमचा संपर्क असला पाहिजे", असा संदेश राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला. 

"आपल्या चिन्हाचे सगळीकडे कंदील लागले पाहिजेत. नाक्यानाक्यावर झेंडे लागले पाहिजेत. पुढचे पाच महिने रात्रभर काम केलं पाहिजे. विजयापर्यंत कसं घेऊन जायचं ती जबाबदारी माझी", असंही ठाकरे यांनी सांगितलंय. 

कुणाला फटका बसणार? 

दरम्यान ठाकरेंच्या स्वबळाचा नाऱ्यामुळे शिंदे की ठाकरे कोणत्या गटाला फटका बसणार अशी चर्चा सुरु झालीय.  मनसेचे 2009 च्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत 13 आमदार विजयी झाले होते. यानंतर लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतरच्या मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेमुळे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार पडले, असाही आरोप करण्यात आला. पण आता शिवसेना 2 गटात विभागलीय. त्यामुळे राज ठाकरेंच्या स्वबळाचा कुणाला फायदा होणार आणि कुणाला फटका बसणार हे लवकरचं स्पष्ट होईल.