मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवलीय. यानंतर त्यांना आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. पण त्या आज चौकशीसाठी हजर राहणार नसल्याचे समोर आलंय. वर्षा राऊत यांनी यासंदर्भात ईडीला पत्र लिहून माहिती दिलीय.
आज ईडी कार्यालयात उपस्थित राहणं शक्य नसल्याचे वर्षा राऊत यांनी ईडीला लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. यासाठी आणखी काही दिवसांचा अवधी त्यांनी ईडीकडे मागितलाय.
पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना समन्स बजावण्यात आलंय. आज २९ डिसेंबरला त्यांना चौकशीला बोलावण्यात आलं होतं. सुमारे महिन्यापूर्वीच ईडीची नोटीस वर्षा राऊत यांना पाठवण्यात आल्याची आल्याची माहिती आहे.
त्यानंतर आता ईडीनं समन्स बजावलंय. यानंतर संजय राऊतांनी आपल्या नेहमीच्या शैलीत ट्वीट करत भाजपला टोला लगावलाय.
आ देखे जरा किसमे कितना है दम, जमके रखना कदम, असं ट्विट संजय राऊत यांनी केलंय. तर ईडी हा भाजपचा पोपट असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीनं दिलीय.
वर्षा राऊत यांच्या बँक अकाऊंटवर काही पैसे जमा झाल्यासंदर्भात त्यांना खुलासा करायला ईडीच्या नोटीशीमध्ये सांगण्यात आलं होतं. पण अजूनही ईडीचं समन्स आलं नसल्याचं खासदार संजय राऊत यांनी झी २४ तासला सांगितलंय.
जेव्हा समन्स माझ्यापर्यंत पोहचेल, तेव्हा नक्की सांगेन, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिलीय. पण त्याचवेळी संजय राऊत यांनी हे सूचक ट्विटही केलंय.