Vice President Dhankar Controversy: भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना महात्मा गांधींबरोबर केली आहे. धनखड यांनी महात्मा गांधींना मागील शतकातील महापुरुष असल्याचं सांगताना पंतप्रधान मोदी हे सध्याच्या शतकातील युगपुरुष असल्याचं म्हटलं आहे. विरोधी पक्षांसहीत अनेक पक्षांनी या तुलनेवरुन उपराष्ट्रपतींवर टीका केली आहे. काँग्रेसच्या एका खासदाराने धनखड यांचं हे विधान लज्जास्पद असल्याचं म्हटलं आहे.
27 नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये आत्मकल्याण दिवसानिमित्त आयोजित कर्यक्रमाला धनखड यांना मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळेस त्यांनी दिलेल्या भाषणामध्ये धनखड यांनी, "मी तुम्हाला सांगू इच्छितो की मागील शतकामध्ये महात्मा गांधींसारखे महापुरुष होऊन गेले. या शतकातील युगपुरुष नरेंद्र मोदी आहेत. महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसेच्या माध्यमातून इंग्रजांच्या गुलामीमधून देशाला मुक्ती मिळवून दिली. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला प्रगतीपथकावर नेलं. याच मार्गावर आपला देश असावं असं आपल्या सर्वांना फार काळापासून वाटत होतं," असं म्हटलं.
धनखड यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सुरु असलेलं स्वच्छता अभियान आणि संसदेमध्ये संमत करण्यात आलेल्या महिला विधोयकाचाही उल्लेख केला. महात्मा गांधी आज जिवंत असते तर त्यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील या दोन्ही योजनांचं कौतुक केलं असतं असंही उपराष्ट्रपती म्हणाले. "आज महात्मा गांधी हयात असते तर या कार्यक्रमांचं कौतुक केलं असतं," असंही धनखड म्हणाले. धनखड यांच्या अधिकृत हॅण्डलवरुन त्यांच्या भाषणातील हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
मैं आपको एक बात कहना चाहूंगा, पिछली शताब्दी के महापुरुष महात्मा गांधी थे, इस शताब्दी के युगपुरुष नरेंद्र मोदी हैं!
महात्मा गांधी ने सत्य और अहिंसा से हमें अंग्रेजों की गुलामी से छुटकारा दिलाया, भारत के यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने देश को प्रगति के उस रास्ते पर डाल… pic.twitter.com/mBP7zxIs0C
— Vice President of India (@VPIndia) November 27, 2023
विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी धनखड यांच्यावर टीका केली आहे. तामिळनाडूमधील शिवगंगा येथील काँग्रेसचे खासदार मणिकम टागोर यांनी ट्वीटरवरुन प्रतिक्रिया नोंदवली आहे. "सर, तुम्ही महात्मा गांधींशी मोदींची तुलना करत असाल तर हे फार लज्जास्पद आहे. सर्वांना ठाऊक आहे की चमचेगिरी करण्याची एक मर्यादा असते. मात्र तुम्ही केलेल्या विधानावरुन तुम्ही ती सीमाही ओलांडल्यासारखं वाटत आहे. अशा पद्धतीने वागल्यास तुम्ही ज्या पदावर आहात त्याचा सन्मान राखला जात नाही," असं मणिकम यांनी म्हटलं आहे.
If you compare with Mahatma it's shameful Sir, we all know there is a limit to sycophancy now you have crossed that limit, and to be in your chair & position and to be a sycophant does not add value Sir. With respect @VPIndia https://t.co/CumvQwNbGN
— Manickam Tagore .B (@manickamtagore) November 27, 2023
यापूर्वी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनीही मोदींची तुलना महात्मा गांधींशी केली होती. मागील वर्षी सिंह यांनी केलेल्या विधानानंतर व विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता.