बाळासाहेबांचं हिंदुत्व दिवसेंदिवस पातळ होत चाललंय; तावडेंचा शिवसेनेला टोला

ढवळ्या शेजारी बसवला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला

Updated: Jan 6, 2020, 04:43 PM IST
बाळासाहेबांचं हिंदुत्व दिवसेंदिवस पातळ होत चाललंय; तावडेंचा शिवसेनेला टोला title=

मुंबई: नागरिकत्व सुधारणा विधेयक (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीवरून (NRC) शिवसेनेने घेतलेल्या केंद्रविरोधी भूमिकेवरून राज्याचे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिवसेनेला टोला लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सध्या 'ढवळ्या शेजारी बसवला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला', अशी गत झाल्याचे त्यांनी म्हटले. तसेच बाळासाहेबांचं हिंदुत्व दिवसेंदिवस पातळ होत चाललंय, असा टोलाही त्यांनी उद्धव यांना लगावला. 

जेएनयुतील विद्यार्थ्यांवरील हल्ल्यामुळे २६/११ ची आठवण झाली- मुख्यमंत्री

तत्पूर्वी आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकारपरिषद घेऊन दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला होता. यावरुनही विनोद तावडे यांनी ठाकरे सरकारला फटकारले. १० रुपयांचे शुल्क ६०० रूपये केले तर राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढणाऱ्यांचे साबरमती हॉस्टेलच्या बाजूच्या चहाच्या टपरीत १० हजारांची उधारी आहे. यापैकी तीन हजारांचे बिल तर फक्त सिगारेटचे आहे. अशा लोकांनी 'जेएनयू'सारख्या विद्यापीठाचा तमाशा केला आहे, अशी टीका यावेळी तावडे यांनी केली. 

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सर्वेसर्वा करण्यासाठी विरोधक एकत्र येणार असल्याच्या वृत्ताचीही त्यांनी खिल्ली उडविली. इतर राज्यांच्या निवडणुका बाकी असताना अशी वक्तव्ये करून विरोधक फोकस स्वत:कडे ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. ज्यांना त्यांची चाकरी करायची असेल त्यांनी खुशाल करावी. मात्र, भविष्यात जे आकडे असतील त्यावरूनच राष्ट्रपती कोण असेल, याचा निर्णय होईल, असेही तावडे यांनी सांगितले.