Mumbai Rain: मुंबईकर आज गाढ झोपेत असताना बाहेर वातावरणात गारवा पसरलाय. आजच्या दिवसाची सुरुवात ढगांचा गडगडाट आणि पावसाने झालीय. मुंबईत अवकाळी पडू लागला आहे. भारतीय हवामान खात्याने मुंबईत 25 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्याप्रमाणे या शहरांमध्ये यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. दरम्यान पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरीमध्ये IMD कडून 'यलो' अलर्ट जारी करण्यात आला आहे. या ठिकाणी पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत.
रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्याच्या उत्तर भागात अवकाळी पाऊस पाहायला मिळाला. अलिबागमध्ये पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास पाऊस पडला. कर्जत, खालापूर, खोपोली, माथेरान मध्ये ही ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. भात कापणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. अवकाळीने भात पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे अवकाळी पाऊस सुरु झाल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. घाटकोपर, विद्यावीहार, कुर्ला, सायन, माटुंगा या परिसरात मध्यम आणि हलक्या स्वरुपाच्या पावसाला सुरुवात झाली आहे. 26-28 नोव्हेंबरसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे रविवारपासून दक्षिण महाराष्ट्रात विविध ठिकाणी वादळी वाऱ्याची शक्यता असल्याचे IMD मुंबईचे प्रमुख सुनील कांबळे यांनी सांगितले.
IMD Mumbai issues 'yellow' alert for tomorrow in Palghar, Thane, Mumbai, Raigad and Ratnagiri pic.twitter.com/vUNfRirZBb
— ANI (@ANI) November 25, 2023
केरळ आणि तामिळनाडू सारख्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये नोव्हेंबरमध्ये असामान्य पावसाची नोंद होत असताना आयएमडीने महाराष्ट्रासाठी हा यलो अलर्ट जारी केला आहे. पावसानंतर मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारेल आणि प्रदूषणही कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून येथील हवेचा दर्जा निर्देशांक मध्यम श्रेणीत आहे. हवामान खात्याने महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि दक्षिण राजस्थानच्या इतर भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. हिमाचल प्रदेशच्या डोंगराळ राज्याच्या अनेक भागात 26 ते 30 नोव्हेंबर दरम्यान पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता आहे.