महाराष्ट्रात पुराचं थैमान सुरू असताना कुठे आहेत शिवसेनेचे ठाकरे? पाहा...

महापुरामुळं कोल्हापूर आणि सांगलीतली परिस्थिती हाताबाहेर गेलीय आणि राजकीय नेते मात्र... 

Updated: Aug 8, 2019, 11:35 PM IST
महाराष्ट्रात पुराचं थैमान सुरू असताना कुठे आहेत शिवसेनेचे ठाकरे? पाहा...  title=

मुंबई : पश्चिम महाराष्ट्रात महापुराचं थैमान सुरू असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मात्र पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात दंग असल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे सांगली आणि कोल्हापुरात गेल्या पाच दिवसांपासून पुरानं थैमान घातलेलं असताना उद्धव ठाकरेंनी त्याबाबत एक शब्दही काढला नाही. मात्र, साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शेखर गोरेंनी मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंना पुराची आठवण झाली. मतांसाठी जनआशीर्वाद यात्रा काढणारे शिवसेना नेते आदित्य ठाकरे आता पूरग्रस्त संकटात असताना कुठे गेले आहेत? असा सवाल उपस्थित होतोय. 
 

दरम्यान, गुरुवारी सांगली जिल्ह्यातल्या ब्रह्मनाळ गावात बचावकार्य करणारी बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत ९ जणांचे मृतदेह सापडलेत. तर ४ जण अजूनही बेपत्ता आहेत. गावकऱ्यांनी सुरु केलेल्या बचावकार्याला दुर्घटनेचं गालबोट लागल्यानं गावावर शोककळा पसरलीय.

तर कोल्हापुरात पावसाच्या पाण्यानं एवढा कहर केलाय की कोल्हापूर शहरात जाणं शक्यच नाही. पंचगंगा, कृष्णा, कोयनेनं कोल्हापूरचे रस्ते, गावं, हायवे सारं काही कवेत घेतलंय. जिथे नजर टाकाल तिथे दिसतंय फक्त पुराचं पाणी... अनेक परिसरांची तळी झालेली दिसत आहेत. पुरामुळे महामार्ग पूर्णपणे ठप्प आहे. मुळात महामार्ग उंचावरुन आहे... त्यावरही पाणी आलंय. याचाच अर्थ खालचा सगळा भाग, घरं, दुकानं सारं काही पाण्यात आहे. 

महापुरामुळं कोल्हापूर आणि सांगलीतली परिस्थिती हाताबाहेर गेलीय. चार चार दिवस लोकांना अन्न-पाण्याशिवाय भीषण परिस्थितीत दिवस कंठावे लागतायत. अशा स्थितीत पीडितांना मदत करायची सोडून राजकीय नेते मात्र भलत्याच कामात अडकलेले दिसत आहेत.