रेल्वेची महिलांना गूड न्यूज; लोकलमध्ये मिळणार आता अतिरिक्त 25 सीट्स

श्चिम रेल्वेने आपल्या सर्व नॉन-एसी नियमित लोकल ट्रेनमध्ये कायमस्वरूपी एका डब्यात अतिरिक्त महिला विभाग जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Updated: Oct 12, 2022, 08:11 AM IST
रेल्वेची महिलांना गूड न्यूज; लोकलमध्ये मिळणार आता अतिरिक्त 25 सीट्स title=

मुंबई : मुंबईच्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये महिलांना आता अतिरिक्त 25 सीट्स मिळणार आहेत. पश्चिम रेल्वेने आपल्या सर्व नॉन-एसी नियमित लोकल ट्रेनमध्ये कायमस्वरूपी एका डब्यात अतिरिक्त महिला विभाग जोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याचे जनरल कंपार्टमेंट अपग्रेड केले जाईल. सध्या मुंबई लोकलमध्ये महिला प्रवर्गासाठी आणखी 25 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. 

यानुसार लोकलमधल्या अकराव्या डब्याचा काही भाग महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आधीच 3 डब्बे राखीव असताना आता चौथा डब्बाही उपलब्ध झालाय. त्यामुळे सेकंड क्लासमध्ये महिलांसाठी अतिरिक्त 25 सीट्स उपलब्ध झाल्यात. यामुळे महिलांना अधिक जागा मिळणार आहेत.

महिला प्रवाशांची टक्केवारी वाढली

उपलब्ध आकडेवारीनुसार, पश्चिम रेल्वेवर महिला तिकीटधारकांची टक्केवारी 24.38% वरून 24.64% झाली आहे. 2019 मध्ये, पश्चिम रेल्वेने बदलत्या काळाच्या अनुषंगाने आपले महिला डबे अद्ययावत केलेत. तेव्हा पश्चिम रेल्वेने महिला डब्यांना मार्किंग करून आधुनिकीकरण केले होते.

लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या जागा वाढवण्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरू होती. त्याचवेळी, या महिन्याच्या सुरुवातीला लोकल ट्रेनमध्ये सीटवरून काही महिला एकमेकांशी भिडल्या. त्यांच्यातील भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ठाणे-पनवेल मुंबई लोकलच्या महिला कोचमध्ये ही घटना घडली.