चर्चा तर होणारच! संजय राऊत यांनी इशारा दिलेले भाजपचे ते साडेतीन नेते कोण?

अनिल देशमुख बाहेर तर भाजपचे ते साडेतीन नेते आत, संजय राऊत यांचा रोख कोणाकडे

Updated: Feb 14, 2022, 02:20 PM IST
चर्चा तर होणारच! संजय राऊत यांनी इशारा दिलेले भाजपचे ते साडेतीन नेते कोण?  title=

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) भाजपाला धमकीवजा इशारा दिलाय भाजपचे साडेतीन नेते लवकरच तुरुंगात असतील असा गौप्यस्फोट केल्याने भाजपचे (bjp) ते तीन नेते कोण? असा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना भाजपवर निशाणा साधतानाच इशारेही दिले आहेत. उद्या शिवसेना भाजप विरोधात मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. उद्या शिवसेनेची  (shivsena) पत्रकार परिषद होईल. मीही असेल. शिवसेनेचे खासदार, आमदार, मंत्री आणि पदाधिकारी असतील. ही शिवसेनेची पत्रकार परिषद असेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

उद्या आम्ही बोलणार तेव्हा संपूर्ण देश ऐकेल. उद्या काय होतं ते बघाच. आता मी काहीच सांगणार नाही. उद्याच काय ते सांगू, असं सांगतानाच हमने बहोत बर्दाश्त किया है, अब बर्बादही हम करेंगे, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून जी काही दादागिरी चालली आहे त्याला आम्ही उत्तर देऊ. केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून शिवसेना, ठाकरे परिवारावर आरोपांचा चिखल उडवला जातोय, त्याला आम्ही उत्तर देऊ. हा जेलमध्ये जाईल तो जेलमध्ये जाईल. देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत असेल असं काही सांगितलं जात आहे. 

पण आता देशमुख कोठडीबाहेर असतील आणि भाजपचे साडेतीन लोकं अनिल देशमुखांच्या कोठडीत असतील. भाजपचे साडेतीन लोकं लवकरच तुरुंगात असतील, असा दावा राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांच्या या इशाऱ्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. 

संजय राऊत काय म्हणाले? 
आम्ही खूप सहन केलं आम्ही, बर्बाद पण आम्हीच करणार आहोत. डोक्यावरुन खूप पाणी गेलंय? आता बघाच, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला इशारा दिला आहे. उद्या शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहे. तिथं संपूर्ण पक्षासह पदाधिकारी, सर्व आमदार, खासदार उपस्थित असतील.  मी आताच बोलणार नाही, उद्या सर्व गोष्टींवर उत्तरं मिळतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 
 
राऊतांनी म्हटलं की,  महाराष्ट्रात देखील सरकार आहे, शिवसेनेच्या नेतृत्वातलं सरकार आहे. त्यांची झोप उडाली आहे. जे करायचं ते करा आता मी घाबरणार नाही, असं राऊतांनी म्हटलं आहे. 

संजय राऊत यांच्या वक्तव्यावर नाना पटोले म्हणतात...
संजय राऊत यांनी दिलेल्या इशाऱ्यावर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना उद्या ज्या साडेतीन शहाण्यांबद्दल बोलणार आहेत, त्यांचा पेपर मी आज का फोडू? एक नक्की आहे की आज त्या साडेतीन शहाण्यांना झोप लागणार नाही, मला माहित आहे ते कोण आहेत, पण जरा सस्पेन्स राहू देत, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.