मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या गुरुवारी जाहीर झालेल्या निकालांमध्ये राज्यात शिवसेना-भाजप युतीने बाजी मारली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काही प्रश्न विचारले. विधानसभेपर्यंत महायुती अभेद्य राहणार का आणि राज्यात मोठा भाऊ कोण?, असे प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले. तेव्हा देवेंद्र यांनी उद्धव यांच्या उपस्थितीत मोठ्या खुबीने या प्रश्नाला उत्तर दिले.
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, उद्धव माझे मोठे भाऊ आहेत. परंतु, मोदी हे उद्धव यांचे मोठे भाऊ आहेत, असे फडणवीसांनी म्हटले.
महायुती अभेद्य आहे. महाराष्ट्राच्या भल्यासाठी सर्व निवडणुका सोबत लढवू. मोदींची विश्वासाची परंपरा महायुती महाराष्ट्रात रुजवतेय. तसेच यावेळी विरोधी पक्षांना ईव्हीएम यंत्रांना दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. या निवडणुकीत विरोधी पक्षांनी कोणताही ठोस कार्यक्रम मांडला नाही. त्यांनी नकारात्मक प्रचार करण्यावर भर दिला. याउलट आम्ही सकारात्मक प्रचार केला. त्यामुळेच आम्हाला विजय मिळाला, असे फडणवीसांनी सांगितले.
आता निवडणूक लढवावी की नाही, हा प्रश्न पडलाय- नारायण राणे
महाराष्ट्रातही शिवसेना-भाजपने जोरदार मुसंडी मारल्यामुळे विरोधकांचे पानिपत झाले आहे. महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांपैकी २३ जागांवर भाजप तर १८ जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांनी विजय आघाडी घेतली आहे. यापैकी बहुतांश मतदारसंघांमध्ये महायुतीचा विजय निश्चित मानला जात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पाच आणि काँग्रेसने एका जागेवर विजय मिळवला आहे.