महाराष्ट्रचे मुख्यमंत्री कोण आहे उद्धव ठाकरे की अजित पवार?- प्रकाश आंबेडकर

वीज बिलावरुन प्रकाश आंबेडकरांची राज्य सरकारवर टीका

Updated: Nov 23, 2020, 03:35 PM IST
महाराष्ट्रचे मुख्यमंत्री कोण आहे उद्धव ठाकरे की अजित पवार?- प्रकाश आंबेडकर title=

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वीज बिलावरुन महाविकासआघाडी सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी भाजपच्या आंदोलनावर देखील टीका केली आहे. तसेच त्यांनी वीज बिल भरु नका असं आवाहन देखील नागरिकांना केलं आहे.

वीज बिल माफी संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेणे अपेक्षित होते. परंतु सध्या परिस्थिती अशी आहे की, सर्व निर्णय अजित पवार घेत आहेत. त्यामुळे आमचा थेट सवाल आहे की महाराष्ट्रचे मुख्यमंत्री कोण आहे उद्धव ठाकरे की अजित पवार?. असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.

वंचित बहुजन आघाडीची पुढील भूमिका म्हणजे वीज बिलं भरू नका, जर तुमची लाईट कापण्यात आली तर वंचित बहुजन आघाडीकडून लाईट जोडून देण्यात येईल. राज्यात मोठ्या संख्येने नागरिक कोरोनापासून वाचण्यासाठी स्वतःची काळजी घेत आहेत. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की लॉकडाऊनची गरज नाही. पूर्वी देखील मी विरोध करत होतो आणि आता देखील करत आहोत. भाजपला आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांच्याच काळात मोठ्या प्रमाणात थकबाकी झाली आहे. असा आरोप देखील त्यांनी केला आहे.