पवारांचा वारसदार पार्थ की रोहित; शरद पवार म्हणाले...

महाराष्ट्रातील जनतेला बदल हवा आहे.

Updated: Oct 7, 2019, 04:04 PM IST
पवारांचा वारसदार पार्थ की रोहित; शरद पवार म्हणाले... title=

मुंबई: पवार घराण्याचा पुढचा वारसदार कोण, हे जनताच ठरवेल, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. ते सोमवारी 'झी २४ तास'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते. पार्थ आणि रोहित यांच्यापैकी पवार घराण्याचा पुढचा वारसदार कोण, असा प्रश्न यावेळी त्यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना पवारांनी म्हटले की, ज्याला लोकांचा पाठिंबा मिळेल आणि लोक ज्याला पुढे आणतील, तोच वारसदार ठरेल. 

'झी २४ तास'चे कार्यकारी संपादक आशिष जाधव यांनी घेतलेल्या या मुलाखतीत शरद पवार यांनी राज्याची सध्याची परिस्थिती, 'ईडी'ची चौकशी, पवार घराण्यातील गृहकलह ते निवडणुकीचा निकाल अशा विषयांवर सविस्तरपणे भाष्य केले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत लोक बदलाच्या विचारात आहेत. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून सत्ता, संपत्ती आणि साधनांचा प्रचंड गैरवापर सुरु आहे. परंतु, महाराष्ट्रातील जनतेला नक्कीच बदल हवा आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. 

यावेळी शरद पवार यांनी आमच्या घरात कोणताही कलह नसल्याचेही स्पष्ट केले. 'ईडी'ने माझ्यावर गुन्हा दाखल केल्यामुळे अजित पवार उद्विग्न झाले होते. याच मनस्थितीत त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्यासाठी कोणताही गृहकलह कारणीभूत नाही. पवार घराणे हे एका मताने वागणारे असल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.