दूरचित्रवाणीवरील सम्राज्ञी एकता कपूर, प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका फराह खान आणि आरोग्याचे धडे देणारी वंदना लुथ्रा यांची देशातील सर्वाधिक प्रभावी ५० महिला उद्योजिका म्हणून नोंद झाली आहे.
फॉर्च्युन इंडिया नियतकालिकाने आपल्या ताज्या अंकात, देशातील प्रभावशाली महिला उद्योजिकांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये अग्रस्थानी आयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांचे नाव आहे. त्याखालोखाल एक्सिस बँकेच्या शिखा शर्मा आणि टाफेच्या मल्लिका श्रीनिवासन अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
बालाजी टेलिफिल्म्सच्या कार्यकारी सहसंचालिका एकता कपूर या एकतिसाव्या क्रमांकावर आहेत. वंदना लुथ्रा अडतिसाव्या तर दिग्दर्शिका फराह खान या बेचाळीसाव्या क्रमांकावर आहेत. पहिल्या दहा उद्योजिकांच्या यादीमध्ये एचटी मीडियाच्या अध्यक्षा आणि संपादकिय संचालिका शोभना भारतीया सातव्या, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या कार्यकारी संचालिका चित्रा रामकृष्ण आठव्या आणि बायोकॉनच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालिका किरण मुजुमदार-शॉ या नवव्या स्थानावर आहेत.
अन्य महिला उद्योजिकांमध्ये कॅपजेमिनी इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अरुणा जयंती, ब्रिटानिया इंडस्ट्रीजच्या व्यवस्थापकीय संचालिका विनिता बाली आणि आरआयएमच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका फ्रेनी बावा यांचा समावेश आहे.
अन्य महत्त्वाच्या महिलांमध्ये पार्क हॉटेल समूहाच्या अध्यक्षा प्रिया पॉल, आयसीआयसीआय व्हेंचरच्या व्यवस्थापकीय संचालिका विशाखा मुळ्ये, मॅट्रिक्स इंडिया एंटरटेनमेंट कन्सल्टंटसच्या व्यवस्थापकीय संचालिका रेश्मा शेट्टी, एचडीएफसीच्या व्यवस्थापकीय संचालिका रेणू सूद-कर्नाड, डिझायनर रितू कुमार, लिंटास मीडिया समूहाच्या अध्यक्षा लिन डिसोझा, स्टेट बँक ऑफ मॉरिशसच्या (इंडिया) मुख्य कार्यकारी अधिकारी सुवलक्ष्मी चक्रवर्ती, एनडीटीव्ही समूहाच्या व्यवस्थापकीय संचालिका राधिका रॉय, पिरामल हेल्थकेअरच्या संचालिका स्वाती पिरामल आदींचा समावेश आहे.