www.24taas.com, मुंबई
मुंबई शेअरबाजाराच्या सेन्सेक्स आज १७ हजार ४०४ अंशावर बंद झाला. त्यात ३४५ अंशाची वाढ पहायला मिळाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५ हजार २९५ अंशांवर बंद झाला. त्यात ११६ अंशांची वाढ झाली. आज बाजारात दिवसभर तेजीचं वातावरण होतं.
सकाळी बाजार उघडल्यापासून शेवटपर्यंत सातत्याने वाढ पहायला मिळाली. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून करण्यात येणा-या पार्टीसिपिटरी नोटवर कर आकारला जाणार नसल्याचं अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी स्पष्ट केल्यानंतर सकाळच्या सत्रात बाजार ३०० अंशांनी वाढला. गेल्या काही दिवसातल्या मंदीच्या पार्श्वभूमीवर, आज गुंतवणूकदारांनी केलेल्या ताज्या खरेदीमुळे रियॅल इस्टेट आणि मेटल स्टॉक्समध्ये वाढ दिसून आली. हेवीवेट रिलायन्स इंडस्ट्रीचे स्टॉक्सही वाढलेले होते.
सदतीस वर्षांच्या इतिहासात रिलायन्सने आर्थिक कामांसाठी प्रथमच दोन मुख्याधिका-यांची नियुक्ती केल्याचे वृत्त होते. एच वन बी वर्क विसाच्या फीमध्ये वाढ करणार नसल्याचं अमेरिकेनं स्पष्ट केल्यानंतर आय टी कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये वाढ पहायला मिळाली.
आज टाटा स्टील, मारूती सुझुकी, हिंडाल्को, आयसीआयसीआय बॅक, रिलायन्स, भेल या कंपन्याचे शेअर्स वधारलेत तर मुथ्थुट फायनान्स, सुझलॉन एनर्जी, युनायटेड ब्रुवरीज, कोरोमंडल इंटरनॅशनल, एमटेक ऑटो या कंपन्याचे शेअर्स घसरलेत.