www.24taas.com, मुंबई
अशोक चव्हाणांची कैफियत मांडण्यासाठी दिल्लीत गेलेल्या चव्हाण समर्थक आमदारांना सोनिया गांधींनी भेट नाकारली आहे. अशोक चव्हाणांना एकटे पाडल्याचा आरोप करत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात अशोक चव्हाण समर्थक आमदार सोनियांकडे तक्रार करणार होते.
आदर्शप्रकरणी सीबीआयने चव्हाण यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केल्यामुळे चव्हाण यांच्यावर अन्याय झाल्याची तसेच पक्षश्रेष्ठी पाठीशी उभे नाहीत, अशी कैफियत चव्हाण समर्थक हायकमांडसमोर मांडणार होते. या भेटीसाठी नांदेडहून जवळजवळ २०० कार्यकर्ते आणि पदाधिकारी दिल्लीत दाखल झाले होते. पण, सोनियांनी मात्र या आमदारांची भेट घेण्यास नकार दिलाय. त्यामुळे आता हे आमदार आता काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांची भेट घेणार आहेत.
त्यामुळे आता अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये एकाकी पडल्याची चर्चा रंगू लागलीय. तर राजकीय विश्लेषकांचं मात्र चव्हाण विरुद्ध चव्हाण वादात कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागलंय.