www.24taas.com, रत्नागिरी
रत्नागिरीत तीन महिन्यांपूर्वी उतरलेल्या हेलिकॉप्टरचं गूढ वाढलंय. हे हिलेकॉप्टर अचानक रत्नागिरीत लँड केल्यामुळे आयबीनं त्यावर संशय व्यक्त केलाय. या हेलिकॉप्टरमधल्या सगळ्यांची पुन्हा एकदा चौकशी करण्याचे आदेश आयबीनं दिलेत.
हेलिकॉप्टरचा प्रवास पाहता, हेलिकॉप्टरनं सुरक्षेच्या दृष्टीनं संवेदनशील असलेल्या ठिकाणांची टेहळणी केल्याचा संशय IB नं व्यक्त केलाय. रत्नागिरीतल्या दापोलीमध्ये ऑक्टोबर महिन्यात अचानक हेलिकॉप्टर उतरल्यानं एकच खळबळ उडाली होती. हे हेलिकॉप्टर एका प्रायव्हेट कंपनीचं होतं आणि खराब हवामानामुळे रत्नागिरीत इमर्जन्सी लँडिंग करावं लागल्याचं तपासात पुढे आलं होतं.
एका फिल्म प्रॉडक्शन कंपनीनं काही लोकेशन्स निश्चित करण्यासाठी हेलिकॉप्टर घेतल्याची माहिती होती. हेलिकॉप्टर बेळगावहून मंगलोरमार्गे मुंबईच्या जुहू एअरपोर्टवर उतरणं अपेक्षित होतं. पण त्याचं रत्नागिरीत इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. या सगळ्य़ा प्रकारावर IB नं संशय व्यक्त केलाय. हेलिकॉप्टरवर कॅमेरा लावण्यात आला होता. कॅमेरा असलेल्या या हेलिकॉप्टरनं सुरक्षेच्या दृष्टीनं संवेदनशील ठिकाणांची टेहळणी केली.
हेलिकॉप्टरला कुठेही इमर्जन्सी लँडिंग करता आलं असतं. मग हेलिकॉप्टर इतक्या लांब रत्नागिरीला का गेलं. एटीसी अर्थात एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला होता, तर पायलटनं इतर विमानांशी संपर्क का केला नाही, असे अनेक सवाल IB नं उपस्थित केलेत. याच प्रकरणी आयबीनं या हेलिकॉप्टरचा पायलट, आणि एका अमेरिकन प्रवाशासह सगळ्यांची चौकशी पुन्हा करण्याचे आदेश दिलेत.